आशिया कप तर जिंकलो पण सोबत वाईट बातमीही मिळाली, ICC ची भारतीय खेळाडूवर मोठी कारवाई
Womens Asia Cup 2026: दुबईमध्ये झालेल्या महिला टी-२० आशिया कप भारतीय संघाने जिंकला. आता या नंतर भारतीय खेळाडूला मोठा झटका बसला आहे.

दुबईमध्ये झालेल्या महिला टी-२० आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर, भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडला आयसीसीकडून कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल तिला तिच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्याच षटकात इमीशा दुलानीला बाद केल्यानंतर, क्रांतीने तिला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यासाठी आक्रमक हावभाव करून आनंद साजरा केला होता.
क्रांती गौड आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत दोषी आढळली आहे, जो मैदानावरील लेव्हल १ चा गुन्हा आहे. हा गुन्हा तेव्हा लागू होतो जेव्हा एखादा गोलंदाज किंवा खेळाडू अपमानास्पद भाषा वापरतो, अयोग्य हावभाव करतो किंवा बाद झालेल्या फलंदाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. क्रांती गौडवर प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्यानंतर तिला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यासाठी आक्रमक हावभाव करून चिथावणी दिल्याचाही आरोप आहे. दोन वर्षांतील या नियमाचे हे पहिले उल्लंघन असून, तिला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
ही घटना श्रीलंकेच्या डावाच्या अगदी पहिल्याच षटकात घडली. श्रीलंकेची फलंदाज इमिषा दुलानीने क्रांती गौडने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने चौकार मारला. मात्र, तीन चेंडूंनंतर, जेव्हा तिने पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती बाद झाली. विकेट घेतल्यानंतर, क्रांतीने रागाने दुलानीला मैदानाबाहेर पाठवले. जेव्हा सामनाधिकारी सुप्रिया राणी दास यांनी क्रांतीच्या वागणुकीबद्दल तिच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तिने कोणताही वाद न घालता आपली चूक मान्य केली. त्यामुळे, वेगळ्या सुनावणीची आवश्यकता भासली नाही.
याव्यतिरिक्त, पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघालाही दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात षटकांचा वेग कमी ठेवल्यामुळे संघाच्या संपूर्ण सामना शुल्कातून ५ टक्के कपात करण्यात आली आहे. १३१ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेने १८.४ षटकांत विजय मिळवला. सामन्यानंतर असे उघड झाले की पाकिस्तानी संघ निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे होता. चौथे पंच रबाब अहसान यांनी तक्रार दाखल केल्यानंतर, सामनाधिकाऱ्याने शिक्षा ठरवली, जी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने कोणताही आक्षेप न घेता स्वीकारली.
