T20 World Cup Women : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंड पहिल्यांदा फोडलं आणि नंतर लोळवलं

| Updated on: Feb 21, 2023 | 9:35 PM

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या बॅटर्संनी पाकिस्तानला आस्मान दाखवलं. इंग्लंडनं पाकिस्तान पराभूत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

T20 World Cup Women : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंड पहिल्यांदा फोडलं आणि नंतर लोळवलं
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकपच्या ब गटातील साखळी फेरीतील अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं. इंग्लंडनं पाकिस्तानचा 115 धावांनी लाजिरवाणा पराभव केला. इंग्लंडनं 20 षटकात 5 गडी गमवून 213 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानचा संघ 20 षटकात 9 विकेट गमवून 99 धावा करु शकला.   नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या बॅटर्संनी पाकिस्तानला आस्मान दाखवलं. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर डॅनी व्यॅट आणि नॅट क्विवर ब्रंट बाजू सावरली. इंग्लंडनं पाकिस्तान पराभूत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. तर पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं स्वप्न यापूर्वीच भंगलं होतं. शेवट तरी गोड होईल अशी अपेक्षा असताना इंग्लंडनं धूळ चारली आहे.

इंग्लंडचा डाव

सोफिया डंकले आणि एलिस कॅपसे या दोघी झटपट बाद झाल्याने संघावर दबाव आला होता. पण डॅनी व्यॅट आणि नॅट क्विवर ब्रंट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. डॅनी व्यॅटनं 33 चेंडूत 59 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर नॅट क्विवर ब्रंट हीने 40 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. डॅनी बाद झाल्यानंतर हिथर नाईटही झटपट बाद होत तंबूत परतली. त्यानंतर एमी जोन्सनं जोरदार फटकेबाजी केली. तिने 31 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोरदार फटका मारताना बाद झाली.

पाकिस्तानचा डाव

इंग्लंडनं विजसाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करता करताना शुन्यावरच पहिली विकेट पडली. सदाफ शाम्स भोपळाही फोडू शकली नाही. त्यानंतर मुनिबा अली 3 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर विकेट्सची रांग सुरु झाली. ओमैमा सोहेल (9), सिद्रा अमीन (12) आणि निदा दार (11), आलिया रियाज (5), सिद्रा नवाज (3), तुबा हस्सन (28) आणि नाश्रा सांधु (1) या धावा करून बाद झाले.

उपांत्य फेरीचं गणित

उपांत्य फेरीत अ गटातून ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. तर न्यूझीलँड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्या संघासाठी चुरस आहे. तर ब गटातून इंग्लंड आणि भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्या फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा असेल. दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलँड किंवा दक्षिण आफ्रिका असा होईल.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

इंग्लंडची प्लेईंग 11  : डॅनी व्यॅट, सोफिया डंकले, एलिस कॅपसे, नॅट क्विवर ब्रंट, हिथर नाइट, एमी जोन्स, सोफी एक्सलस्टोन, कॅथरिन क्विवर ब्रंट, चार्ली डीन, सारा ग्लेन, फ्रेया डेव्हिस

पाकिस्तानची प्लेईंग 11 : सदाफ शाम्स, मुनीबा अली, ओमैमा सोहेल, सिद्रा अमीन,निदा दार, एलिया रियाझ, फातिमा साना, सिद्रा नवाज, नाश्रा सांधू, तुबा हस्सन, सादिया इकबाल