Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आज एक चान्स मिळाला, तर एकाचवेळी सचिनपासून रोहितपर्यंत ब्रेक होऊ शकतात 5 रेकॉर्ड
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आज आयर्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली तर ते ऐतिहासिक पदार्पण ठरु शकतं. एकाचवेळी पाच भारतीय दिग्गजांच्या नावावर असलेले रेकॉर्ड मोडले जातील. वैभव सूर्यवंशीकडे छाप उमटवण्याची एक चांगली संधी आहे.

Vaibhav Sooryavanshi : मागच्यावर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केल्यापासून भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सतत चर्चेत आहे. चर्चेत राहण्यामागचं मुख्य कारण आहे त्याचं वय. वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षांचा आहे. वैभव सूर्यवंशीला आता आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी20 सीरीजसाठी सिनियर टीम इंडियात स्थान मिळालं आहे. या सीरीजमधील पहिला सामना 26 जूनला खेळला जाणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर तो मैदानावर पाऊल ठेवताच सचिन तेंडुलकरपासून रोहित शर्मा पर्यंत अनेक दिग्गजांचे ऐतिहासिक रेकॉर्ड मोडू शकतो.
भारताकडून पुरुष इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 1989 साली पाकिस्तान विरुद्ध डेब्यू केला. त्यावेळी त्यांचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. वैभवला जर आज आयर्लंड विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर तो सचिन तेंडुलकर यांच्या नावावर 37 वर्षांपासून असलेला कमी वयात डेब्यू करण्याचा रेकॉर्ड मोडू शकतो. वैभव भारताचा सर्वात युवा इंटरनॅशनल क्रिकेटर ठरेल. तो आता अवघ्या 15 वर्षांचा आहे.
वैभवला 5 सिक्स मारावे लागतील
भारताकडून पहिलाच T20 सामना खेळताना सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड विकेटकिपर फलंदाज इशान किशनच्या नावावर आहे. इशानने अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुद्ध डेब्यू करताना 4 गगनचुंबी षटकार मारले होते. वैभव सूर्यवंशी आक्रमक खेळण्यासाठी आणि हिटिंगसाठी ओळखला जातो. जर, त्याने आयर्लंड विरुद्ध 5 सिक्स मारले, तर तो इशान किशनला मागे टाकून या लिस्टमध्ये टॉपवर जाईल.
फक्त एक धाव जास्त करण्याची गरज
भारताकडून पहिल्याच T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे. रहाणेने वर्ष 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला T20 सामना खेळताना 39 चेंडूत 61 धावा फटकावल्या होत्या. वैभव सूर्यवंशीने अजिंक्य पेक्षा एक धाव जास्त काढली तर तो अजिंक्य रहाणेचा 15 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडू शकतो.
पहिली धाव घेणारा खेळाडू बनेल
भारताच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत चार खेळाडूंनी आयर्लंडच्या मैदानावर टी20 इंटरनॅशनलमध्ये डेब्यू केलाय. यात सिद्धार्थ कौल, उमरान मलिक, प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंह आहेत. खास बाब म्हणजे या चौघांपैकी एकही जण पहिल्या सामन्यात एक धाव करु शकले नाहीत. वैभवला संधी मिळाली तर तो डेब्यू मॅचमध्येच आयर्लंडच्या भूमीवर पहिली धाव घेणारा खेळाडू बनेल.
रोहितचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
आयर्लंडच्या खेळपट्ट्यांवर T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वात यशस्वी ओपनर आहे. रोहितने आयरिश भूमीवर 159.01 च्या स्ट्राइक रेटने 97 धावा फटकावल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने 98 धावा केल्या, तर तो रोहित शर्माला मागे टाकून आयर्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय टी20 ओपनर ठरेल.