
इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलं. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या सीरीजमध्ये असे काही खेळाडू होते, ज्यांना या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. ते पूर्णवेळ बेंचवरच बसून होते. भारतीय संघातील एक ओपनर खूप निराश झाला. आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याच दु:ख त्याने वडिलांना फोनवरुन सांगितलं. याचा खुलासा स्वत: त्याच्या वडिलांनी केलाय. आता स्वत: हेड कोच गौतम गंभीर यांनी त्या खेळाडूला आश्वासन दिलय. त्यामुळे लवकरच सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनची 4 वर्षापासूनची प्रतिक्षा संपू शकते.
पाचव्या कसोटी सामन्यात आपल्याला खेळण्याची संधी मिळेल असा अभिमन्यू ईश्वरनला पूर्ण विश्वास होता. पण, जेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, तेव्हा तो निराश झाला. याचा खुलासा अभिमन्यूचे वडिल रंगनाथन परमेश्वरन यांनी केला. विक्की लालवानीच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत ते या बद्दल बोलले. ईश्वरनने मला फोन करुन सांगितलं की, पप्पा मला अजूनही जागा मिळालेली नाही. अभिमन्यू ईश्वरनने इंडिया-ए टीमकडून खेळताना इंग्लंडमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. मात्र, तरीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. त्याला वर्ष 2021-22 मध्ये पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण अजूनपर्यंत तो डेब्यू मॅच खेळू शकलेला नाही. ईश्वरनच्या वडिलांनी सांगितलं की, टीमचे कोच गौतम गंभीर यांनी त्याला विश्वास दिला आहे.
‘तुला संधी नक्की मिळेल’
शेवटच्या कसोटी सामन्यातही संधी न मिळाल्याने सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन खूप निराश होता. वडिल परमेश्वरन ईश्वरन यांनी सांगितलं की, “कोच गौतम गंभीर स्वत: मुलाशी बोलले. त्यांनी अभिमन्यूला विश्वास दिला. ते म्हणाले की, तुझं बरोबर चाललं आहे. तुला संधी नक्की मिळेल. तू दीर्घकाळ टीम इंडियासाठी खेळशील”
तुला तुझा हक्क जरुर मिळेल
“मी तो नाही, जो एक-दोन कसोटी सामन्यानंतर तुला टीम बाहेर करणार. मी तुला भरपूर संधी देईन” असं गौतम गंभीरने सांगितलय. “संपूर्ण कोचिंग स्टाफने त्याला विश्वास दिला की, तुला तुझा हक्क जरुर मिळेल” असं अभिमन्यूचे वडिल म्हणाले. परमेश्वरन ईश्वरन म्हणाले की, ‘मागच्या चार वर्षांपासून माझा मुलगा देशाकडून खेळण्याची प्रतिक्षा करत आहे’ त्याने 23 वर्ष भरपूर मेहनत केलीय. इंग्लंडवरुन परतल्यानंतर अभिमन्यूने दुलीप ट्रॉफीची तयारी सुरु केलीय.
प्रथम श्रेणीमध्ये किती हजार धावा
अभिमन्यु ईश्वरनचे वडिल म्हणाले की, त्यांचा मुलगा दुलीप ट्रॉफीच्या तयारीसाठी बंगळुरुला जाणार आहे. तो तिथे 10-12 दिवस राहिलं. काही दिवसांसाठी डेहराडूनला जाईल. अभिमन्यू ईश्वरनची 2021-22 साली पहिल्यांदा टीम इंडियात निवड झाली होती. पण त्याला अजूनपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्यानंतर 15 खेळाडूंनी टेस्ट डेब्यु केलाय. अभिमन्यू ईश्वरनने 103 प्रथम श्रेणी सामन्यात 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत.