
IND vs SA T20 World Cup 2026 : आयीसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 राऊंडमधील रोमांचक लढतींना सुरुवात झाली आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ग्रुप-1 मधील पहिला सुपर-8 चा सामना खेळला जाईल. दोन्ही टीम्सचा सुपर-8 राऊंडमधील हा पहिला सामना आहे. दोन्ही टीम्स आपपाल्या ग्रुपमध्ये अपराजित आहेत. त्याशिवाय शानदार फॉर्ममध्ये आहेत. सुपर-8 राऊंडमधील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार होता. पण पावसाने या सामन्यावर पाणी फिरवलं. आता प्रश्न हा आहे की, भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावेळी हवामान कसं असेल?.
श्रीलंकेत कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना होणार होता. याआधी सुद्धा श्रीलंकेतच टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. पण भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या दृष्टीने फॅन्ससाठी चांगली बातमी आहे. एक्यवेदरनुसार, मॅचच्या दिवशी अहमदाबादमध्ये अजिबात पावसाची शक्यता नाहीय. आकाश स्वच्छ असेल. संपूर्ण सामन्याच्यावेळेत हवामान अनुकूल असेल. दिवसा तापमान 34-36 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचतं. पण संध्याकाळी आणि रात्रीच्यावेळी हे तापमान 20 डिग्रीच्या आसपास असेल. म्हणजे फॅन्सना संपूर्ण 40 ओव्हर सामन्याचा थरार अनुभवता येईल.
2024 फायनलची रीमॅच असावी
मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी दव फायद्याचा ठरतो. हा सामना म्हणजे 2024 फायनलची रीमॅच असावी असं चाहत्यांना वाटतं. भारताने साऊथ आफ्रिकेला हरवून शेवटचा टी20 वर्ल्ड कप उंचावला होता.
भारतासाठी चांगली बाब काय?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीम्स ग्रुप स्टेजमध्ये टॉपवर होत्या. टीम इंडियाने आपल्या ग्रुपमध्ये चारही सामने जिंकले होते. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने सुद्धा आपल्याच ग्रुपमध्ये चार सामने जिंकले आहेत. अहमदाबादमध्ये कुठल्या तरी एका टीमचा विजय रथ नक्कीच थांबेल. हेड टू हेड बोलायचं झाल्यास दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 35 टी20 सामने झाले आहेत. यात भारत 21 आणि दक्षिण आफ्रिका 13 सामने जिंकली आहे. एक सामना अनिर्णीत राहिला. भारतासाठी ही एक चांगली बाब आहे.