U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final : टीम इंडियानं पाकिस्तानला जागा दाखवली, PM मोदींनी पोरांची पाठ थोपटली
U19 Asia Cup 2026 IND vs PAK Final, Narendra Modi : युवा खेळाडूंचं यश देशातील अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. त्यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचंही म्हटलं आहे.

पाकिस्तानला पराभूत करत भारतीय युवा संघाने अंडर-19 आशिया कप 2026 चं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारात भारताने विजय मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युवा खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला धूळ चारत अंडर-19 आशिया कप 2026 वर आपलं नाव कोरलंय. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आणि आशिया कपचं विजेतेपद पटकावलं. या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
नरेंद्र मोदींकडून टीम इंडियाचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद व्यक्त केलाय. भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अत्यंत शानदार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच युवा क्रिकेटपटूंनी केलेल्या प्रभावी कामगिरीचा अभिमान असल्याचं सांगितलं. या खेळाडूंचं यश देशातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
शेवटच्या चेंडूवर भारताचा थरारक विजय
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचं झाल्यास, पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या टप्प्यात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. भारताला 52 चेंडूंमध्ये 86 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मोहित उलवा याने मनाल चौहानला साथ दिली. चौहानने आक्रमक फलंदाजीची जबाबदारी सांभाळली, तर मोहितनेही काही जबरदस्तत फटके मारत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
मनाल चौहान 47 धावांवर बाद झाला, त्यावेळी भारताला विजयासाठी 29 धावांची गरज होती आणि हातात केवळ एक विकेट शिल्लक होती. मात्र, सी. व्यंकटाने संयम दाखवला, तर मोहितने आक्रमक खेळ सुरू ठेवला. अखेर शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 3 धावांची गरज असताना मोहितने कव्हर्सच्या दिशेने शानदार फटका मारत भारताला आशिया कप जिंकून दिला.