U19 World Cup Final : टीम इंडियाचा पराभव, बांगलादेश पहिल्यांदाच विश्वविजेता

| Updated on: Feb 09, 2020 | 10:20 PM

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर 3 गडी राखत मात केली  (U19 World Cup Final)  आहे.

U19 World Cup Final : टीम इंडियाचा पराभव, बांगलादेश पहिल्यांदाच विश्वविजेता
Follow us on

Ind vs Ban जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर 3 गडी राखत मात केली  (U19 World Cup Final)  आहे. यामुळे पहिल्यांदाच बांगलादेशने अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं 177 धावांचं आव्हान बांग्लादेशने 3 गडी राखत पूर्ण केलं. भारताकडून रवी बिश्नोई आणि सुशांत मिश्राने गोलंदाजीत भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांना माघारी धाडलं. मात्र अंतिम टप्प्यात टीम इंडियाने हा सामना गमावला.

भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या अविशेक दास, शोरिफुल इस्लाम यांच्या भेदक माऱ्यामुळे भारताचा डाव 177 धावांवर आटोपला. त्यामुळे बांगलादेशला 178 धावांचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा बांगलादेशच्या फलंदाजांनी आश्वासक खेळी करत यशस्वीरित्या पाठलाग केला.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने आश्वासक खेळी केली. सलामीवीर परवेझ इमॉन आणि तांझिद हसन या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर तांझिद हसन बाद झाला आणि बांगलादेशला पहिला धक्का बसला. त्यानंतर 12. 1 षटकांत रवी बिश्नोईच्या चेंडूवर मोहमदुल हसन जॉय अवघ्या 8 धावा करत बाद झाला. यानंतर बांगलादेशला सलामीवीर परवेझ इमॉन या खेळताना काही त्रास जाणवू लागल्याने इमॉनने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर मैदानात आलेल्या तौहीद हृदॉय, शहादत हुसैन, शमीम हुसैन या मधल्या फळीतील गोलंदाजांनाही माघारी धाडण्यात टीम इंडियाला यश आलं. बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतर अकबर अली – अविशेक दास ही जोडी मैदानात जम बसवत असताना सुशांत मिश्राने अविशेक दासला आऊट केलं आणि बांगलादेशची ही जोडी फुटली.
 टीम इंडियाने बांगलादेशचा 6 वा विकेट घेतल्यानंतर मात्र परवेझ इमॉन आपली दुखापत विसरुन पुन्हा मैदानात उतरला. परवेझ आणि अली या जोडीने मैदानात चौफेर फलंदाजी करत बांगलादेशला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलंडला. यानतंर यशस्वी जैसवालने ही जोडी फोडत इमॉनला आऊट केलं.

इमॉन माघारी परतल्यानंतर कर्णधार अकबर अली आणि रकीब उल-हसन या जोडीने संयमी खेळ करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

या सामन्यात टीम इंडियाकडून रवी बिश्नोई 4, सुशांत मिश्रा 2 आणि यशस्वी जैसवालने 1 विकेट घेतली. मात्र या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी केली नाही.

भारताकडून एकट्या सलामीवीर यशस्वी जैस्वालने 121 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने त्याला साथ देत 65 चेंडूत 38 धावा केल्या. यात 3 चौकारांचा समावेश आहे. मात्र हे दोन फलंदाज वगळता टीम इंडियाकडून कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली (U19 World Cup Final) नाही.

नाणेफेक जिंकत गोलदांजीचा निर्णय घेतलेल्या बांगलादेशने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. भारताकडून मैदानात उतरलेल्या यशस्वी जैसवाल आणि दिव्यांश सक्सेनाला बांगलादेश गोलंदाजांनी मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. दिव्यांश सक्सेना उंच फटका मारण्याच्या नादात अवघ्या 2 धावा करत झटपट माघारी परतला.

यानंतर तिलक वर्मा आणि यशस्वी जैसवालने टीम इंडियाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 94 धावा केल्या. मात्र 29 व्या षटकांत तिलक वर्मा आऊट झाला आणि भारताला गळती लागली. यानंतर मैदानात उतरलेल्या ध्रुव जुरेल वगळता प्रियाम गर्ग, सिद्धेश वीर, अर्थव अंकोलेकर यातील कोणत्याच खेळाडूला अवघ्या 10 धावाही करता आल्या नाहीत. यामुळे टीम इंडियाला 47.2 षटकांत सर्व बाद 177 धावा करता आल्या. दरम्यान बांगलादेशकडून अविशेक दास 3, हसन शाकीब आणि शोरिफुल इस्लामने प्रत्येकी 2, रकीब उल-हसनने 1 विकेट (U19 World Cup Final) घेतल्या.