Axar Patel | मॅकेनिकल इंजिनियर बनण्याचं स्वप्न, नववीत असताना क्रिकेटच वेड, आता 42 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Feb 16, 2021 | 3:06 PM

अक्षर पटेलने (Axar Patel) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या.

Axar Patel | मॅकेनिकल इंजिनियर बनण्याचं स्वप्न, नववीत असताना क्रिकेटच वेड, आता 42 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
अक्षर पटेलने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या.
Follow us on

चेन्नई : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs England 2nd Test) इंग्लंडवर चौथ्या दिवशी 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी या विजयात निर्णायक भूमिका बजावली. दुसऱ्या डावातील एकूण 10 विकेट्स या फिरकीपटूंनीच घेतल्या. तर पहिल्या डावात एकूण 7 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाकडून पदार्पण केलेल्या अक्षर पटेलने (Axar Patel) या सामन्यात दोन्ही डावात अनुक्रमे 2 आणि 5 अशा एकूण 7 विकेट्स मिळवल्या. या कामगिरीसह अक्षरने डेब्यू सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. (india vs england 2nd test Debutante axar patel braeak dilip doshi 42 years old record)

काय आहे रेकॉर्ड?

अक्षर पटेलने 42 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्याने दिलीप दोशी यांचा विक्रम मोडीत काढला आहे. यासह अक्षर पदार्पणातील सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिलाच डावखुरा फिरकीपटू ठरला. दोशी यांनी 1979 मध्ये चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं. या सामन्यात दोशी यांनी कांगारुंच्या 5 फलंदाजांना आऊट केलं होतं. दरम्यान अक्षरला दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते.

15 वर्षांपर्यंत क्रिकेटचा विचारही नाही

आपल्या मोठं होऊन काही तरी बनायचं आहे, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तसंच अक्षरलाही मॅकेनिकल इंजिनिअर बनायचं होतं. पण अपघाताने क्रिकेटकडे वळला. या मागे मोठा किस्सा आहे. अक्षर नववीत शिकत होता. धीरेन कंसारा हा अक्षरचा वर्गमित्र होता. आवश्यक खेळाडूसंख्या पूर्ण न झाल्याने धीरेनने अक्षरला आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सांगितलं. यानंतर अक्षरला क्रिकेटचं वेड लागलं. त्यानंतर अक्षरने मागे वळून पाहिलं नाही.

अक्षर पटेलची क्रिकेट कारकिर्द

अक्षर पटेलने टीम इंडियाकडून 38 एकदिवसीय आणि 11 टी -20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. अक्षरला कसोटी संघात स्थान दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण टीम मॅनेजमेंटला रवींद्र जाडेजाच्या जागी तशाच खेळाडूची आवश्यकता होती. म्हणून अक्षरला पदार्पणाची संधी देण्यात आली. अक्षरनेही टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला. अक्षरने अपेक्षित कामगिरी केली. दरम्यान अक्षरने 39 प्रथम श्रेणी सामन्यात 134 बळी घेतले आहेत.

दरम्यान या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे 4 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे तिसरा कसोटी सामना हा या सीरिजच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test | पहिल्या कसोटीतील पराभवाची परतफेड, इंग्लंडवर शानदार विजय, टीम इंडियाच्या विजयाचे 5 प्रमुख कारणं

अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला, टीम इंडियाच्या विजयाचा धडाकेबाज शिल्पकार

Axar Patel | पदार्पणात अक्षर पटेलचा इंग्लंडला जोरदार ‘पंच’; ‘ही’ कामगिरी करणारा नववा भारतीय

(india vs england 2nd test Debutante axar patel braeak dilip doshi 42 years old record)