IndvsNz Live : भारताचा 92 धावांत खुर्दा, न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी विजय

IndvsNz Live : भारताचा 92 धावांत खुर्दा, न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी विजय

हॅमिल्टन: अवघ्या 92 धावा भारताचा खुर्दा केल्यानंतर, न्यूझीलंडने चौथ्या वन डे सामन्यात 8 विकेट्स राखून विजय मिळवला. अवघ्या 14.4 षटकात न्यूझीलंडने केवळ दोन विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. न्यूझीलंडकडून रॉस टेलर नाबाद 37 आणि निकोल्सने नाबाद 30 धावा केल्या. तर भुवनेश्वरने मार्टिन गप्टील आणि कर्णधार विल्यमसन यांना बाद करुन, भाराताला दोन विकेट्स मिळवून दिल्या.

त्याआधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि कुलीन ग्रॅण्डहोमच्या घातक गोलंदाजीने चौथ्या वन डे सामन्यात भारताचा अवघ्या 92 धावांत खुर्दा  उडाला. बोल्टने 10 षटकात 21 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे त्याने तब्बल 4 षटकं निर्धाव टाकली. तर ग्रॅण्डहोमने 10 षटकात 2 निर्धाव, 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.  त्यामुळे भारताला 30.5 षटकात सर्वबाद 92 धावाच करता आल्या. न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 93 धावांची गरज आहे.  भारताची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2010 मध्ये दाम्बुला इथं 88 धावांवर भारताचा डाव आटोपला होता.

भारताकडून यजुवेंद्र चहलने सर्वाधिक नाबाद 18 धावा केल्या. त्यावरुन भारतीय फलंदाजीचा अंदाज लावता येईल. चहल आणि कुलदीप यादवने नवव्या विकेटसाठी सर्वाधिक 25 धावांची भागीदारी केल्याने भारताला किमान 90 धावांचा टप्पा ओलांडता आला. कुलदीप यादवने 33 चेंडूत 15 धावा केल्या.

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची दाणादाण उडाली. अवघ्या 55 धावात भारताचे 8 फलंदाज तंबूत परतले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि कुलीन ग्रॅण्डहोमने घातक गोलंदाजी करत, भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. अशा परिस्थितीत भारताला 75 धावांचा टप्पा गाठणंही कठीण वाटत होतं. टीम इंडिया आज कर्णधार विराट कोहली आणि भारताचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीशिवाय मैदानात उतरली. रोहित शर्मा भारताचं नेतृत्त्व करत आहे.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून, भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. जम बसतोय असं वाटत असताना धवनने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र याच हाणामारीच्या नादात त्याला ट्रेंट बोल्टने पायचित बाद केलं. धवनने 20 चेंडूत 13 धावा केल्या. यानंतर मग बोल्टने पुढच्याच षटकात रोहितला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. रोहित 7 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 23 अशी झाली.

यानंतर फलंदाजीसाठी आलेला युवा फलंदाज शुभमन गिलने 20 चेंडू खेळून काढले. मात्र बोल्टने त्यालाही स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. गिलने 21 चेंडूत 9 धावा केल्या. त्याआधी रायुडू आणि कार्तिकला ग्रॅण्डहोमने भोपळाही फोडू दिला नाही. दोघेही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था 11.3 षटकात 5 बाद 33 अशी होती.

अशा परिस्थितीत सर्व आशा केदार जाधव आणि हार्दिक पंड्यावर होती. मात्र केदार जाधवला बोल्डनेच पायचित करुन भारताला सहावा धक्का दिला. केदारने अवघी 1 धाव केली. मग पंड्याने तळाच्या फलंदाजांच्या साथीने धावा जमवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत भुवनेश्वर कुमारला ग्रॅण्डहोमने 1 धावेवर माघारी धाडून भारताला सातवा दणका दिला. त्यानंतर हार्दिक पंड्याही बोल्टची शिकार ठरला. पंड्याने सर्वाधिक 16 धावा केल्या, या सर्व धावा चौकार ठोकून जमवल्या. पंड्या बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था 19.4 षटकात 8 बाद 55 अशी होती.

यानंतर चहल आणि कुलदीप यादवने 25 धावांची भागीदारी केली. कुलदीपला अॅस्टलने 15 धावांवर बाद केलं. यानंतर खलीलला 5 धावांवर निशामने बाद करुन भारताचा डाव 92 धावांत गुंडाळला.

शुभमन गिलचं पदार्पण  
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत 19 वर्षाखालील विश्वविजेत्या संघाचा जबरदस्त खेळाडू शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळाली आहे. शुभमनने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये तुफान फलंदाजी केली होतीच, शिवाय रणजी सामन्यांमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या. त्यामुळे कोहलीने त्याची तोंडभरुन कौतुक केलं. आज त्याला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली.

52 वर्षांनी इतिहास रचणार
भारताने जर 4-0 अशी आघाडी मिळवली, तर भारत 52 वर्षांनी हा नवा विक्रम रचेल. भारताने पहिल्यांदा 1967 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारताने कसोटी मालिका 3-1 (4) ने जिंकली होती. भारताने 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत 3-1 (5) असा विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या

कोहलीशिवाय टीम इंडिया, पण रोहितचं ‘द्विशतक’ निश्चित! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *