IndvsNZ Test | पहिल्या कसोटीत भारताची पडझड, निम्मा संघ तंबूत, 122 चेंडूत 38 धावा करुन रहाणे मैदानात

पावसाने व्यत्यय आणलेल्या या कसोटीत, पहिल्या दिवसअखेर भारताने 5 बाद 122 अशी तुटपुंजी मजल मारली आहे. India vs New Zealand Wellington test

IndvsNZ Test | पहिल्या कसोटीत भारताची पडझड, निम्मा संघ तंबूत, 122 चेंडूत 38 धावा करुन रहाणे मैदानात
सचिन पाटील

|

Feb 21, 2020 | 12:07 PM

India vs New Zealand Wellington test वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाची पडझड झाली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या कसोटीत, पहिल्या दिवसअखेर भारताने 5 बाद 122 अशी तुटपुंजी मजल मारली आहे. अजिंक्य रहाणे 38 तर रिषभ पंत 10 धावा करुन मैदानात आहेत. (India vs New Zealand Wellington test)

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. न्यूझीलंडच्या काईल जेमीसनने धडाकेबाज पदार्पण करत, भारताचे तीन फलंदाज तंबूत धाडले. चहापानापर्यंत भारताने 5 बाद 122 अशी मजल मारली. मात्र त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने, तिसऱ्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही.

भारताकडून पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरले. टीम साऊदीने अवघ्या 16 धावांवर पृथ्वी शॉला त्रिफळाचीत करुन भारताला पहिला धक्का दिला. पृथ्वी शॉने 18 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा केल्या.

यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने मयांकच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जेमीसनने त्याला 11 धावांवर बाद करुन भारताला दुसरा धक्का दिला. मग जेमीसननेच कर्णधार विराट कोहलीला अवघ्या 2 धावांवर माघारी धाडत, भारताला बॅकफूटवर ढकललं. कोहली बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 3 बाद 40 अशी होती.

एकीकडे फलंदाज बाद होत असताना मयांक अग्रवाल जपून फलंदाजी करत होता. मयांकने अजिंक्य रहाणेच्या साथीने एकेरी-दुहेरी धाव घेत, धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाची धावसंख्या 88 वर पोहोचली असताना, मयांक बाद झाला. बोल्टने त्याला जेमीसनकरवी झेलबाद केलं. त्याने 84 चेंडूत 34 धावा केल्या.

यानंतर आलेल्या हनुमा विहारीलाही चमक दाखवता आली नाही. सराव सामन्यात शतक ठोकणारा हनुमा विहारी केवळ 7 धावा करुन माघारी परतल्याने, भारताची अवस्था 5 बाद 101 अशी झाली.

त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनी अत्यंत सावध फलंदाजी करत, पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. खेळ थांबला तेव्हा रहाणे 122 चेंडूत 38 तर रिषभ पंत 37 चेंडूत 10 धावा करुन मैदानात होते. न्यूझीलंडकडून काईल जेमीसनने सर्वाधिक 3 तर टीम साऊदी आणि ट्रेण्ट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें