#INDvsNZ : न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा 22 धावांनी पराभव, वनडे मालिकाही भारताने गमावली

| Updated on: Feb 08, 2020 | 3:47 PM

फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी खेळी वगळता भारतीय संघातील एकाही फलंदाजाला सामन्यात चमक दाखवता आली नाही.

#INDvsNZ : न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा 22 धावांनी पराभव, वनडे मालिकाही भारताने गमावली
Follow us on

ऑकलंड (न्यूझीलंड) : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव झाला. यजमान संघाने दिलेल्या 274 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. ऑकलंड वनडेमध्ये 48.3 षटकांत सर्व विकेट्स गमावून भारताला 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी खेळी वाया गेल्या. परिणामी दुसऱ्या वनडेसह (India Vs New Zealand Auckland One Day) वनडे मालिकाही भारतीय संघाने गमावली.

फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरने 57 चेंडूंत 52 धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ 24, तर मयांक अगरवाल अवघ्या तीन धावांवर बाद झाला. रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जागी झालेली निवड दोघंही सार्थ ठरवू शकले नाहीत. भरवशाच्या विराट कोहली, केदार जाधव आणि केएल राहुल यांनीही निराशा केली. कोहली 15, राहुल 4, जाधव 9, चहल 10 धावांवर तंबूत परतले.

आठव्या विकेटसाठी रवींद्र जाडेजा आणि नवदीप सैनी यांनी सर्वाधिक 76 धावांची भागिदारी रचली. जाडेजाने 55, तर सैनीने 45 धावा ठोकल्या.

त्याआधी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचं लक्ष्य ठेवलं. 50 षटकांत न्यूझीलंडने 8 विकेट्स गमावून 273 धावा रचल्या. तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत असतानाही चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या रॉस टेलरने शेवटपर्यंत टिकून राहत नाबाद 73 धावा उभारल्या.

सलामीला उतरलेल्या मार्टिन गप्टिलने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकत 79 चेंडूंत 79 धावांची खेळी केली. निकोलसच्या साथीने त्याने 93 धावांची भागीदारी केली. मात्र गप्टिल बाद झाल्यानंतर फलंदाज एकमागून एक तंबूत परतले. एक बाद 142 वर असलेल्या न्यूझीलंडची अवस्था आठ बाद 197 अशी दयनीय झाली होती.

लॅथम, निशाम, ग्रँडहोम, चॅपमन आणि सौदी यांना एकआकडी धावाच करता आल्या. रॉस टेलरला पाच फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याचं पाहून गडगडलेला डाव सावरण्यावाचून पर्याय नव्हता. टेलरच्या 73 धावांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडला अडीचशे पार धावसंख्या उभारता आली. (India Vs New Zealand Auckland One Day)

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे पहिला वनडे सामना गमवावा लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीत काहीशी सुधारणा केल्याचं दिसलं. युजवेंद्र चहलने चॅपमॅनला टाकलेल्या चेंडूचा झेल स्वतःच टिपत चकित केलं, तर रवींद्र जाडेजाने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवून निशामला रनआऊट केलं.

वनडे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणं आवश्यक होतं. टी20 मालिकेत 5-0 असा क्लीन स्वीप दिल्यानंतर पहिल्या वनडेतही टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र गोलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता दुसरा वनडेही हातातून गमवावा लागला. India Vs New Zealand Auckland One Day