
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशी गमावली. दोन्ही संघांमधील अंतिम सामना काल अर्थात रिवावर 18 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झाला. मात्र तिथे भारतीय संघाला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीचं शतकही भारताला पराभवापासून वाचवू शकलं नाही. हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा डाव 296 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. विराट कोहलीने 124 धावा केल्या, पण त्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तेही पुरेसं ठरलं नाहीये.
मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा एकदिवसीय मालिका विजय आश्चर्यकारक मानला जात आहे. खरंतर भारतीय संघ हाँ वनडे मध्ये फेव्हरिटचा टॅग घेऊन उतरली होती, पण संघाचा परफॉर्मन्स फार उत्तम ठरला नाही. बहुतेक भारतीय संघाने न्यूझीलंडला हलक्यात घेतलं असावं. हीच चूक त्यांना भारी पडल्याचं अखेरीस दिसून आलं.
या मालिकेत किवींच्या संघाने वरिष्ठ फलंदाज केन विल्यमसन, नियमित कर्णधार मिचेल सँटनर आणि स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीशिवाय प्रवेश केला होता. तसेच अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र आणि वेगवान गोलंदाज जेकब डबी यांनाही एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. जेडेन लेनोक्स आणि ख्रिश्चन क्लार्क हे तर त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका खेळत होते. वेगवान गोलंदाज अष्टपैलू झाचेरी फौल्क्सची ही तिसरी एकदिवसीय मालिका होती आणि यष्टीरक्षक मिशेल हेची ही चौथी मालिका होती.
अनुभव कमी पण जोश हाय
न्यूझीलंडने कमी अनुभवी खेळाडू असूनही भारतीय संघाला हरवले. वडोदरा वनडेमध्ये विराट कोहलीच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने विजय मिळवला. पण, राजकोट आणि इंदूर वनडेमध्ये भारतीय संघाची कामगिरी तितकी चांगली नव्हती. ना फलंदाजीत सातत्य आणि गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी नव्हती. परिणामी, न्यूझीलंडने भारतीय भूमीवर त्यांची पहिली एकदिवसीय मालिका जिंकली.
Daryl Mitchell and Glenn Phillips centuries eclipse Virat Kohli’s masterful knock in New Zealand’s historic ODI series win 🙌#INDvNZ https://t.co/L1TfXCnKVF
— ICC (@ICC) January 18, 2026
डॅरिल मिशेलच्या फलंदाजीच्या पराक्रमावर भारतीय संघाला तोडगा सापडलाच नाही. मिशेलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले, त्यानंतर सलग दोन सामन्यात शतके झळकावली. मिशेलने 176 च्या सरासरीने एकूण 352 धावा केल्या. मिशेल हा आधीच भारतीय संघाचा चाहता आहे आणि त्याने त्यांच्याविरुद्ध चार एकदिवसीय शतके झळकावली आहेत. विल यंग, ग्लेन फिलिप्स, डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनीही किवी संघाकडून फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.
भारताचे पॉझिटिव्ह पॉईंट्स
भारतीय संघासाठी, या मालिकेतील सकारात्मक बाब म्हणजे विराट कोहली आणि हर्षित राणा यांचे उत्कृष्ट प्रदर्शन. कोहलीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला, तीन सामन्यांमध्ये 80 च्या सरासरीने 240 धावा केल्या. दरम्यान, हर्षित राणाने सहा विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना 83 धावाही फटाकवल्या. राजकोट वनडेमध्ये केएल राहुलनेही शतक झळकावले, जे संघासाठी चांगले संकेत आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माची मालिका निराशाजनक होती, त्याने 3 डावात फक्त 61 धावा केल्या. दुखापतीतून परतलेला श्रेयस अय्यर देखील फक्त 60 धावा करू शकला. तर अनुभवी ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजा हाही फलंदाजी आणि बॉलिगं, दोन्हींमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला.