न्यूझीलंडच्या बोलर्सचा चक्रव्यूह भेदायचाय, विराट या आग ओकणाऱ्या बोलर्सला घेऊन चाललाय!

| Updated on: May 18, 2021 | 1:14 PM

भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवण्यासाठी न्यूझीलंड जो प्लॅन बनवेल तो त्यांच्यावर उलटवण्यासाठी विराटसह अर्जन नागवासवाला सज्ज आहे. (Virat kohli Special Plan to tackle New Zealand Fast Bowler

न्यूझीलंडच्या बोलर्सचा चक्रव्यूह भेदायचाय, विराट या आग ओकणाऱ्या बोलर्सला घेऊन चाललाय!
विराट कोहली
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन कसोटीतीलही वर्ल्ड कप जिंकायची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत. मात्र हे काम तितकं सोपं नाही. कारण भारताला इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याला तोंड द्यायचंय. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचे सगळे प्लॅन फेल करण्यासाठी बीसीसीआयने विराटच्या (Virat Kohli) मदतीला एक खास खेळाडू दिला आगे. त्याचं नाव अर्जन नागवासवाला (Arzan Nagwaswalla)… याच हुकमी एक्क्याला घेऊन विराट न्यूझीलंडने आखलेले सगळे मनसुबे उधळून लावण्याच्या तयारीत आहे. (Indian Captain Virat kohli Special Plan to tackle New Zealand Fast Bowler Ind vs NZ WTC 2021)

न्यूझीलंडची त्रिमुर्ती, भारतीय बॅट्समनची ‘खरी कसोटी’

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रिषभ कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांचा सामना ट्रेंट बोल्ट, टिम साउथी आणि नील वॅगनर या आग ओकणाऱ्या बोलर्सशी होणार आहे ते ही इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्टीवर… न्यूझीलंडच्या या त्रिमुर्ती बोलर्ससमोर भारतीय बॅट्समनची खरी कसोटी यावेळी लागणार आहे.

न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याला कसं तोंड द्यायचं?, भारताचा प्लॅन ठरला

भारतीय फलंदाजांसमोर सर्वात मोठे आव्हान नील वॅगनर आणि ट्रेंट बोल्ट याचं असणार आहे. वॅगनर इंग्लंडच्या भूमीत दोन कसोटी सामने खेळला आहेत. या 35 वर्षीय गोलंदाजाकडे काऊन्टी क्रिकेटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तो एसेक्सच्या टीमचा भाग राहिला आहे. वॅगनर आणि बोल्टच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी भारताकडे एक असा हुकमी एक्का आहे ज्याच्याविषयी फार कमी लोकांना माहितीय तो हुकमी एक्का आहे अर्जन नागवासवाला…!

विराट-अर्जन न्यूझीलंडचे मनसुबे उधळण्यासाठी तयार

कोहलीच्या नेतृत्वात डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्जुन नागवासवालाह टीम इंडिया इंग्लंडला जाणार आहे. अर्जन राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियाबरोबर इंग्लंडला जातोय. परंतु त्याला विशेष रणनिती करुन इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय झाला आहे. न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याला जर तोंड द्यायचं असेल तर भारतीय संघात देखील तसाच खेळाडू हवा जो नेटमध्ये प्रॅक्टिस करताना भारतीय फलंदाजांकडून कसून सराव करुन घेईन, त्यांना अडचणीत आणणारे चेंडू टाकेन. जेणेकरुन भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवण्यासाठी न्यूझीलंड जो प्लॅन बनवेल तो त्यांच्यावर उलटवण्यासाठी विराटसह अर्जन नागवासवाला सज्ज आहे. अर्जनची बाऊन्सर आणि यॉर्कर टाकण्यासाठी ख्याती आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भल्याभल्यांना आपल्या बाऊन्सर आणि यॉर्करने घायाळ केलंय. आता भारतीय संघातील दिग्गजांना अडचणीत आणणारे चेंडू टाकून लढाईआधी अर्जन भारतीय संघातील खेळाडूंचे हात बळकट करेल.

अर्जन नागवासवालाने रचला इतिहास

मूळचा गुजराती असलेला अर्जनचं वय वर्ष केवळ 23 आहे. इतक्या कमी वयात त्याने खास इतिहास रचला आहे. 46 वर्षानंतर प्रथमच भारतीय संघात निवड झालेला तो पहिला पारशी खेळाडू आहे. अर्जन अगोदर फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) भारतीय संघात खेळले होते. त्यानंतरच्या 46 वर्षांत कोणत्याही पारशी खेळाडूला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकली नाही किंबहुना पारशी खेळाडू भारतीय संघाचं दार ठोठावू शकले नाहीत.

अर्जनची क्रिकेट कारकीर्द

अर्जन नागवासवाला गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील नारगोल गावचा रहिवासी आहे. त्याने गुजरातसाठी 16 फर्स्ट क्लास, 20 लिस्ट ए आणि 15 टी ट्वेन्टी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 62, 39 आणि 21 विकेट्स घेतल्या आहेत.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल.

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झान नाग्वास्वाल्ला.

(Indian Captain Virat kohli Special Plan to tackle New Zealand Fast Bowler Ind vs NZ WTC 2021)

हे ही वाचा :

Sushil Kumar चा पाय खोलात, अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात धाव, पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा, भारतीय संघाचा दिग्गज कोरोनाविरुद्धची मॅच जिंकला!

अर्थशास्त्राचं ज्ञान घेऊन भारतीय संघात दाखल, चेन्नईसाठी असं शतक ज्या शतकाने करिअरला बळ दिलं!