
भारतीय क्रिकेट संघात आज वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही. संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज आहेत. पण पाठीमागच्या 20-25 वर्षांपूर्वी टीम इंडियात बोलर्स फार कमी होते.1990 च्या दशकात, अशा एका बोलरने निळ्या जर्सीमध्ये प्रवेश केला, ज्याने देशात वेगवान गोलंदाजीचा कारखाना सुरु केला, असं आपण म्हणू शकतो. तो दिग्गज गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ... म्हैसूर एक्स्प्रेस म्हणून श्रीनाथला ओखळलं जातं. भारताच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्येच नव्हे तर अत्यंत शिक्षित क्रिकेटपटूंमध्येही त्याचं नाव घेतलं जातं.

श्रीनाथचा जन्म कर्नाटकातील हासन जिल्ह्यात 31 ऑगस्ट 1969 रोजी झाला. तिथून श्रीनाथ म्हैसूरला गेला. मर्यादामप्पा हायस्कूलमधून त्याने शालेय शिक्षण झाले. यादरम्यान त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण अभ्यास सोडला नाही. त्याने तातडीने म्हैसूरच्या एसजेसीई कॉलेजमधून इंस्ट्र्यूमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक.ची डिग्री मिळविली.

बी.टेक. ची पदवी संपादन केल्यानंतर त्याने 1991 मध्ये भारतीय संघात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन महिन्यांनंतर त्याने कसोटी संघातही आपलं स्थान निर्माण केले आणि आपल्या वेगाने भल्या भल्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. 90 च्या दशकात एक गोलंदाज लागोपाठ 140-150 किमी / तासाच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो, हे निव्वळ आश्चर्यचकित करणारं होतं. पण ती किमया जवागल श्रीनाथने करुन दाखवली.

श्रीनाथच्या संघातील समावेशाने भारतीय गोलंदाजीला वेगासह धार मिळाली. त्याच्या इनस्विंगमुळे जगातील दिग्गज फलंदाज त्याला घाबरुन राहू लागले. भारताच्या एकदिवसीय आणि टेस्ट क्रिकेटचा तो महत्त्वाचा भाग होता. मात्र, वनडेमध्ये त्याने अधिक जलवा दाखवला. निवृत्तीच्या 18 वर्षानंतरही तो एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा बोलर आहे.

श्रीनाथ 2002 मध्ये कसोटीतून तर 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 236 विकेट्स घेतल्या, ज्यात 10 डावांमध्ये त्याने 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. तर 229 एकदिवसीय सामन्यात त्याने 315 विकेट्स घेतल्या. इतकंच नाही तर कसोटीत 4 अर्धशतकांसह त्याने एक हजाराहून अधिक धावा केल्या.निवृत्तीनंतर श्रीनाथ आता आयसीसीच्या मॅच रेफरीच्या भूमिकेत आहे.