
भारतीय टीमने न्यूीलंडविरुद्ध सलग दुसरा टी 20 सामना जिंकून सीरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. रायपूरमध्ये दुसरा सामना झाला. टीम इंडियाने 209 धावांचं लक्ष्य अवघ्या 92 चेंडूत पार केलं. या विजयात भारतीय टीमकडून कॅप्टन सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 37 चेंडूत 82 धावा फटकावल्या. पण विजयाचा खरा पाया रचला तो ईशान किशनने. त्याने कठीण परिस्थितीत येऊन न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. त्याने वेगवान अर्धशतक झळकावलं. पण ईशानच्या या इनिंग दरम्यान सूर्याला त्याचा राग सुद्धा येत होता. मॅच संपल्यानंतर सूर्याने या बद्दल खुलासा केला.
न्यूझीलंडच्या 209 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय टीमने फक्त 6 धावांवर आपले दोन स्फोटक ओपनर गमावले होते. मात्र, या कठीण परिस्थिती ईशान किशनने फक्त भारतीय टीमचा डावच संभाळला नाही, तर न्यूझीलंडवर प्रतिहल्ला चढवला. त्याने फोर-सिक्सचा पाऊस पाडला. याचा परिणाम असा झाला की, भारताने पावरप्लेमध्येच 75 धावा केल्या. ईशाने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. लवकरच टीम इंडियाने 8.1 ओव्हर्समध्ये 100 धावांचा टप्पा पार केला.
इतकं चांगलं खेळणाऱ्या ईशानवर सूर्याला राग का येत होता?
ईशान अखेरीस 10 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आऊट झाला. ईश सोढीला सिक्स मारण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला. डावखुऱ्या ईशाने फक्त 32 चेंडूत 76 धावा कुटल्या. यात 11 फोर आणि 4 सिक्सचा समावेश आहे. त्याच्या या बॅटिंगने कॅप्टन सूर्यकुमारसह सर्वांनाच खुश केलं. ईशान जेव्हा न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धुलाई करत होता. त्यावेळी भारतीय कॅप्टनला त्याच्यावर राग येत होता. त्याचं कारणही तसचं खास आहे.
राग येण्याबद्दल सूर्या काय बोलला?
ज्यावेळी दोघे क्रीजवर होते. त्यावेळी बहुतांश वेळ ईशानकडेच स्ट्राइक होता. भारतीय कर्णधार सूर्या नॉन स्ट्राइकला उभा होता. त्यामुळे सूर्याला बॅटिंगची संधी मिळत नव्हती. 9 व्या ओव्हरमध्ये 43 चेंडूतच दोघांची 100 धावांची भागीदारी पूर्ण झाली. त्यावेळी त्यात ईशान 31 चेंडू खेळला होता. सूर्याच्या वाट्याला फक्त 13 चेंडू आले होते. या भागीदारीत सूर्याच्या फक्त 19 धावा होत्या.
मॅच संपल्यानंतर सूर्या या बद्दल गंमतीशीर अंदाजात बोलला. “मला त्याचा राग येत होता. कारण पावरप्लेमध्ये मला तो स्ट्राइकच देत नव्हता. पण मी परिस्थिती समजून घेण्यात यशस्वी ठरलो. मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करतोय. चांगला ब्रेक घेतला. या मॅचआधी प्रॅक्टिस सेशन सुद्धा चांगलं होतं” असं सूर्या म्हणाला.