Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं

Japan Open 2026 : भारताची स्टार शटलर . व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेईचा पराभव करून 'जपान ओपन 2026 अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. गेल्या दोन वर्षांतील तिची ही पहिलीच अंतिम फेरीतील धडक आहे.

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं
पी.व्ही.सिंधूने रचला इतिहास
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 18, 2026 | 11:10 AM

PV Sindhu reaches Japan Open 2026 Final : भारताची प्रसिद्ध बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधूने शनिवारी ‘जपान ओपन 2026 महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला. 31 वर्षीय पी.व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेईचा पराभव करत, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच स्थान निश्चित केलं. या विजयामुळे सिंधूने आपल्या चिनी प्रतिस्पर्ध्याविरुद्धची सलग पाच पराभवांची मालिकाही खंडित केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात,सिंधू ह 21-19, 15-10 अशी आघाडीवर होती, मात्र तेव्हाच हॅमस्ट्रिंग’च्या दुखापतीमुळे, तिची प्रतिस्पर्धी चेन युफेईला सामना अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली. ज्यामुळे सिंधूला फायनलचं तिकीट मिळालं.

सुरूवातीपासून दबाव कायम

सुरुवातीपासूनच आघाडी घ्यायची आणि ती टिकवून ठेवायची, अशी या महत्त्वाच्या सामन्यासाठी सिंधूची रणनीती पहिल्यापासूनच स्पष्ट होती. मात्र या सामन्याची सुरुवात तिला हवी तशी झाली नाही, कारण युफेईने सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. मात्र तरीही सिंधूने हार न मानता, उत्तम खेळ केला आणि लवकरच शानदार पुनरागमन केलं. त्यामुळे तिने पहिल्या गेमच्या मध्यापर्यंत चार गुणांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर, माजी ऑलिम्पिक विजेती चेन युफेई हिने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि गुणसंख्या 19-19 अशी बरोबरीवर आणली. मात्र असं असूनही, सिंधूने तिचा संयम ढळू दिला नाही आणि पहिल्या ‘गेम पॉइंट’चा पुरेपूर फायदा घेत तिने पहिला गेम 21-19 अशा फरकाने जिंकला.

दुसरा गेमही असाच झाला. सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवलं. तिने सहजपणे 15-10 अशी आघाडी घेतली होती. मात्र काही काळाने चिनी खेळाडूने, वेदनेमुळे सामना पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला.

2024 सालानंतर सिंधू पहिल्यांदाच फायनलमध्ये

सिंधूची या हंगामातील ही पहिलीच अंतिम फेरी आहे, जी तिने ‘सुपर 750’ स्पर्धेत गाठली आहे. यापूर्, दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच 2024 साली सिंधूने अंतिम सामना खेळला होता, तेव्हा तिने ‘सैयद मोदी इंटरनॅशनल’चे विजेतेपद पटकावलं.
त्यानंतर आजच्या या विजयामुळे सिंधूने बॅडमिंटन कोर्टवरील आपली दमदार पुनरागमनाची वाटचाल सुरू ठेवली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला तिचे जागतिक मानांकन 18 व्या स्थानापर्यंत घसरलं होतं; मात्र, आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर तिने पुन्हा एकदा अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान पटकावलं असून, सध्या ती जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर आहे.

फायनलमध्ये कोणाशी लढत ?

रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी पडणार असून, दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी सिंधूचा सामना होणार आहे. ही दुसरी उपांत्य फेरी जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या शानदार कामगिरीनंतर, सिंधू अंतिम सामन्यातही आपली उत्कृष्ट लय कायम राखेल आणि देशासाठी या वर्षातील पहिलं विजेतेपद पटकावेल, अशी सर्व चाहत्यांना आशा आहे.

Follow Us