
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काल लखनऊ येथे होणारा चौथा T20 सामना रद्द झाला. त्यानंतर सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात बुमराहचा संयम सुटल्याच दिसत आहे. बुमराहला इतकी चीड आली की, त्याने समोरच्या व्यक्तीच्या हातातून फोन हिसकावून घेतला. बुमराहशी संबंधित हा व्हिडिओ एअरपोर्टवरचा आहे. तिथे तो रांगेत उभा होता. त्याचवेळी चाहत्याच्या एका कृतीने बुमराहचा पारा चढला.
बुमराहसोबत हा फॅन असं काय करत होता? हा प्रश्न आहे. एअरपोर्टवर तो चाहता सुद्धा रांगेत उभा होता. जेव्हा त्याने बुमराहला शेजारच्या रांगेत उभा असल्याच पाहिलं, तेव्हा त्याने विनापरवानगी सेल्फी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. बुमराहने आधी त्याला समजावलं असं करु नकोस. बुमराहने चाहत्याला व्हिडिओ बनवू नको म्हणून वॉर्निंग दिली. पण जेव्हा चाहत्याने ऐकलं नाही, दुर्लक्ष केलं. तेव्हा बुमराहचा संयम सुटला. त्याने चाहत्याकडून फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला.
जसप्रीत बुमराह आणि चाहत्यामध्ये काय बाचाबाची झाली?
चाहता – सर, मी तुमच्यासोबतच जाणार आहे.
बुमराह – तुझा फोन पडला, तर मला बोलू नकोस.
चाहता – काही हरकत नाही सर.
बुमराह – ठीक आहे.
त्यानंतर बुमराहने त्याचा फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. हे सर्व व्हिडिओमध्ये दिसतय.
What an arrogant behavior by Jasprit Bumrah. First he threatened his fan that he would throw his phone, and later he snatched the fan’s phone. pic.twitter.com/O2e4jSLw7s
— 𝐆𝐨𝐚𝐭𝐥𝐢𝐟𝐢𝐞𝐝 👑 (@Goatlified) December 17, 2025
बुमराहच या सीरिजमध्ये प्रदर्शन कसं आहे?
जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. कटक येथे पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट काढले. मुल्लापूर येथे दुसऱ्या टी 20 सामन्यात एकही विकेट मिळाला नाही. तिसरा टी 20 सामना धर्मशाळा येथे झाला. बुमराह त्यात व्यक्तिगत कारणामुळे खेळू शकला नाही. लखनऊमध्ये होणारा चौथा टी 20 सामना रद्द झाला. आता सीरीजमधला पाचवा आणि अखेरचा टी 20 सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 डिसेंबरला होईल. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा हुकूमी एक्का मानला जातो. त्याने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर अनेक सामने एकहाती फिरवले आहेत.