
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसऱ्या हंगामातील सामना रद्द झाल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 20 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील WCL सामना रद्द करण्यात आला तेव्हा 21 जुलै रोजी मँचेस्टर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सिराजला थेट प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानेही तितकेच सडेतोड उत्तर दिलं. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळावा का? असा प्रश्न सिराजला विचारण्यात आला होता.
जसा प्रश्न तसंच थेट उत्तर
मँचेस्टर कसोटीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मोहम्मद सिराज पत्रकार परिषदेत आला होता. पण अशा वेळेला, त्याला अशा बाउन्सर प्रश्नाचा सामना करावा लागेल असा विचारही त्याने केला नसेल. मात्र, खेरच जेव्हा त्याच्यावर हा बाऊन्सर आदळला, तेव्हा मात्र त्याने खूप चांगल्या प्रकारे हाताळला. पाकिस्तानशी मॅच खेळण्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे सिराजने अवघ्या 6 शब्दांमध्ये उत्तर दिलं.
पाकिस्तानविरुद्धच्या मॅचबद्दल काय म्हणाला सिराज ?
आता प्रश्न असा आहे की मोहम्मद सिराज नेमकं काय म्हणाला ? (भारताने) पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा की नाही? असा सवाल मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत सिराजला विचारण्यात आला होता. WCL मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला कारण 5 भारतीय खेळाडूंनी त्यांची नावे मागे घेतली होती, असंही त्याला सांगण्यात आलं होतं. हे सर्व प्रश्न ऐकून सिराज फक्त म्हणाला, “मी काय बोलावं, ते कळत नाही”
मँचेस्टर टेस्टमध्ये सिराजकडून उत्तम प्रदर्शनाची अपेक्षा
मोहम्मद सिराज हा टीम इंडियाच्या गोलंदाजी क्रमवारीत एक मजबूत दुवा आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये 6 डावात ३32२ च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आहेत. मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीत सिराजकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल, तिथे विजय मिळवणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे.