French Open 2025: कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन, फायनलमध्ये आर्यना सबालेंकोचा धुव्वा
Aryna Sabalenka vs Coco Gauff : कोको गॉफ हीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवला आहे. कोको याआधी 2022 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र तेव्हा कोकोला पराभवाचा सामना करावा लागला होता.

क्रीडा विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या यूएसएच्या कोको गॉफ हीने इतिहास घडवला आहे. कोकोने फ्रेंच ओपन2025 च्या वूमन्स सिंग्लचा खिताब पटकावला आहे. कोको गॉफ हीने रोलँड गॅरोसमधील फिलिप चॅटियर टेनिस कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या महामुकाबल्यात बेलारुसच्या आर्यना सबालेंकाचाचा धुव्वा उडवला. कोकोने आर्यनाचा एकूण 2 तास 38 मिनिटं रंगलेल्या सामन्यात 6-7 (5), 6-2, 6-4 अशा फरकाने पराभव केला.कोकोची फ्रेंच चॅम्पियन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. नंबर 1 असणाऱ्या सबालेंकाचं यंदा चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं.
कोको गॉफचं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद
आर्यना सबालेंका आणि कोको गॉफ यांच्यातील झालेला पहिला सेट फार उत्कंठावर्धक असा राहिला. दोघींनीही एकमेकांची सर्व्हिस तब्बल चार वेळा ब्रेक केली. त्यामुळे पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये सबालेंकाने बाजी मारली. त्यानंतर गॉफने दुसऱ्या सेटमध्ये दणक्यात कमबॅक केलं. गॉफने दुसरा सेट आपल्या नावावर केला. सबालेंका हीने तिसरा सेटपर्यंत आधीच हार मानली. सबालेंका थकली असल्याने तिने गॉफसमोर गुडघे टेकले.
कोको गॉफ हीने 2022 साली फ्रेंच ओपनच्या फायनलपर्यंत मजल मारली होती. कोको तेव्हा चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर राहिली. तेव्हा कोकोवर इगा स्विएटेक हीने मात करत विजेतेपद पटकावण्यापासून रोखलं होतं. गॉफच्या कारकिर्दीतील यंदाचं हे दुसरं ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद ठरलं. गॉफने याआधी 2023 साली यूएस ओपनमध्ये बाजी मारली होती. तर दुसऱ्या बाजूला आर्यना सबालेंका ही पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहचली होती. सबालेंका हीने 2023 आणि 2024 मध्ये ऑस्ट्रेलिय ओपनमध्ये मैदान मारलंय. तर 2024 मध्ये यूएस ओपनमध्ये इतिहास घडवलाय.
मिशेल ओबामा यांच्याडून कोको गॉफचं अभिनंदन
Congrats, @CocoGauff! Your determination, strength, and grace throughout the French Open has inspired us all – and showed us what’s possible. Proud of you! pic.twitter.com/krxZW3QAIG
— Michelle Obama (@MichelleObama) June 7, 2025
रविवारी महामुकाबला
तर दुसऱ्या बाजूला रविवारी 8 जून रोजी मेन्स सिंगल फायनलमध्ये जॅनिक सिन्नेर विरुद्ध स्पेनचा कार्लोस अल्काराज आमनेसामने असणार आहेत. जॅनिक सिन्नेर वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर कार्लोस अल्काराज दुसऱ्या स्थानी आहे. अल्काराज याने गेल्या वर्षी फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे अल्काराजसमोर यंदा जेतेपद कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जॅनिक सिन्नेर याचा पहिल्यांदा फ्रेंच ओपन पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष असणार आहे.
