डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेच्या कष्टाचं चीज, ‘या’ पदावर शासकीय नोकरीमध्ये निवड

| Updated on: Mar 05, 2024 | 5:10 PM

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं.

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेच्या कष्टाचं चीज, या पदावर शासकीय नोकरीमध्ये निवड
Follow us on

मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या कष्टाचं चीझ झालेलं आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा पैलवानासाठी आनंदाची बातमी आहे. बलदंड शरीरयष्टी असलेल्या शिवराज राक्षे याला शासकीय नोकरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं. एकदा नाहीतर दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा शिवराज आता क्रीडा अधिकारी म्हणून काम करणार आहे.

क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलं. शिवराज याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं  मैदान मारलं होतं. त्यानंतर धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने आपला मित्र असलेल्या हर्षेवर्धन सद्गीर याला चीतपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता.

कोण आहे शिवराज राक्षे?

पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगरमधील राक्षेवाडी गावचा हा पैलवान गडी. शिवराज याला त्याच्या घरातूनच कुस्तीचे धडे शिकवले गेले, कारण वडिल आणि आजोबा यांनीही पैलवानकी केली होती. राक्षे कुटुंबाची इच्छा होती की शिवराजने महाराष्ट्र केसरीचं मैदान मारत चांदीची गदा पटकावी. वडील शेतीबरोबर दुधाचा व्यवसाय करतात, घरच्यांनीही शिवराजला तयारीसाठी कोणतीही कमी पडू दिलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज सराव करतो.