
मध्य रेल्वेत टीसी पदावर कार्यरत असणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. स्वप्निलने भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला 50मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवून दिलं. भारताचं हे या स्पर्धेतील आणि नेमबाजीतील एकूण तिसरं पदक ठरलं आहे. स्वप्निल या प्रकारात भारताला पदक मिळवून देणारा पहिलाच नेमबाज ठराला आहे. तसेच स्वप्निल ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचं नाव उंचावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी 1952 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर आता तब्बल 72 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्वप्निलने ही कामगिरी केली आहे. स्वप्निलच्या या कामगिरीनंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील एक वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
स्वप्निलचं या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री या तिघांनी स्वप्निलंच अभिनंदन केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांशी संपर्क करत हवं ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर सोशल मीडियावर स्वप्निलच्या इंस्टाग्राम बायोमधील ते एक वाक्य व्हायरल झालं आहे. “वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही”, असं वाक्य स्वप्निलच्या इंस्टा बायोमध्ये आहे. आता हे वाक्य स्वप्निलच्या विजयानंतर व्हायरल झालं आहे.
Go to Swapnil Kusale’s Instagram. Click on see translation. 🔥🇮🇳 pic.twitter.com/y788v4Xhvf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 1, 2024
दरम्यान भारताने या ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 3 पदकं मिळवली आहेत. स्वप्निलआधी भारताला सरबज्योत सिंह आणि मनु भाकर या दोघांनी भारताला पदकं मिळवून दिली. मनु भाकर हीने भारताचं खातं उघडलं. त्यानंतर मिश्र दुहेरी या प्रकारात मनु आणि सरबज्योतने भारताला दुसरं पदक मिळवून दिलं.
दरम्यान स्वप्निल कुसाळे याला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसेच तो परतल्यावर त्याचा सत्कार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस म्हटलं.