Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

| Updated on: Jun 15, 2021 | 12:17 PM

तब्बल 25 वर्षानंतर युरो चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत पुनरागमन केलेल्या स्कॉटलंड संघाची सुरुवात खास झाली नाही. पहिल्याच सामन्यात त्यांना चेक रिपब्लिककडून 2-0 ने पराभव पत्करावा लागला.

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात
स्लोवाकिया आणि पोलंड सामन्यातील एक क्षण
Follow us on

ग्लासगो : यूरो कप 2020 स्पर्धेला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. चेक रिपब्लिक (Czech Republic) संघाने त्यांच्या पहिल्याच सामन्यात अद्भुत गोलच्या सहाय्याने स्कॉटलंडवर (Scotland) 2-0 च्या फरकाने शानदार विजय मिळवला आहे. सोमवारी 14 जूनला ग्लासगोच्या हँम्पडेन पार्क स्टेडियममध्ये झालेल्या दिवसाच्या पहिल्या सामन्या 25 वर्षानंतर स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या स्कॉटलँडला चेक रिपब्लिककडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्लोवाकियाने (Slovakia) बलाढ्य पोलंडवर (Poland) 2-1 ने विजय मिळवला. (In UEFA Euro 2020 Czech Republic Beat Scotland and Slovakia Poland)

स्कॉटलँड आणि चेक रिपब्लिक यांच्यातील सामना स्कॉटलंडसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण स्कॉटलंड तब्बल 25 वर्षानंतर युरोपियन चँम्पियनशिपमध्ये आपला पहिला सामना खेळला होता. याआधी 1996 मध्ये स्कॉटलंड स्पर्धेत सहभागी झाला होता. तसेच 1998 च्या फिफा विश्वचषकानंतर (Fifa World Cup) पहिल्यांदाच स्कॉटलंड इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे.

स्कॉटलंडची झुंज अयशस्वी

सामन्याच्या पहिल्या हाल्फपर्यंत स्कॉटलंडने चांगला खेळ दाखवला. काही अॅटॅक देखील केले. पण चेक रिपब्लिकचा गोलकीपर टोमाष वातश्लिकने अप्रतिम सेव्ह करत एकही गोल होऊ दिला नाही. त्यानंतर हाल्फ टाईम व्हायला 3 मिनिटं शिल्लक असताना 42 व्या मिनिटाला चेकच्या व्लादिमिर कुफॉलच्या अप्रतिम क्रॉसवर शिकने हेडरद्वारे सुंदर गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्ये पुन्हा चेकच्या शिक याने स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गोलची नोंद केली. 52 व्या मिनिटाला मैदानाच्या मध्यातून शिकने अप्रतिम किक मारत थेट गोल पोस्टमध्ये बॉलला पोहचवलं.
स्कॉटलंडचा गोलकिपर डेविड मार्शल गोल पोस्टपासून काहीसा पुढे आल्याने शिकने घेतलेल्या किकला तो थांबवू शकला नाही आणि एका अनोख्या अप्रतिम गोलची नोंद झाली. त्यानंतर स्कॉटलंडने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश न आल्याने सामना 2-0 ने चेक रिपब्लिकच्या खिशात गेला.

स्लोवाकिया संघाची दमदार सुरुवात

रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मैदानात सोमवारच्या दिवसातील दुसरा सामना खेळवला गेला. यात बलाढ्य पोलंड संघाला स्लोवाकियाने मजबूत टक्कर देत 2-1 ने सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला स्लोवाकियाच्या रॉबर्ट मॅकने पोलंडच्या डिफेन्डर्सना चकवत एक उत्कृष्ट शॉट घेतला. परंतू बॉल गोलपोस्टला लागून पोलंडच्या गोलकीपर वॉयचेख शचेनस्नीच्या (Wojciech Szczęsny) डोक्याला लागून गोलच्या आत गेला. ज्यामुळे स्लोवाकिया संघाला 1-0 ची आघाडी मिळाली. युरो चषकाच्या इतिहासात गोलकीपरद्वारा केला गेलेला हा पहिला आत्मघातकी गोल ठरला. सामन्यात एका गोलने पिछाडीवर असलेल्या पोलंडने दुसऱ्या हाल्फच्या पहिल्याच मिनिटात गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मिडफील्डर कॅरोल लिनेटीने हा गोल केला. ज्यानंतर 69 व्या मिनिटाला पुन्हा एकदा स्लोवाकियाला मिळालेल्या कॉर्नरच्या मदतीने मिलान स्क्रिनीअरने गोल करत पुन्हा एकदा आघाडी मिळवली, हा गोल सामन्यात निर्णायक ठरला आणि सामन्यात स्लोवाकियाने 2-1 ने विजय मिळवला.

हे ही वाचा :

Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय

Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात

UEFA EURO 2020 | सामन्यादरम्यान डेन्मार्कचा दिग्गज फुटबॉलपटू मैदानातच कोसळला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल, सामना स्थगित

(In UEFA Euro 2020 Czech Republic Beat Scotland and Slovakia Poland)