आशिया कप स्पर्धेपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी होणार लढत

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. कोणत्याही मैदानात या दोन्ही देशाचे खेळाडू जीवाची बाजी लावून खेळतात. पुन्हा एकदा हे दोन्ही देश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनिमित्त आमनेसामने आले आहेत.

आशिया कप स्पर्धेपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी होणार लढत
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना, कोण मारणार बाजी? याकडे लक्ष
| Updated on: Aug 25, 2023 | 8:07 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. हा सामना ॲथलेटिक्स मैदानात होणार आहे. बुडापेस्टमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. रविवार 27 ऑगस्टला ऑलिम्पिक चॅम्पियन आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीम यांच्यात सामना होणार आहे. दुसरीकेड, नीरज याच्या व्यतिरिक्त डीपी मनु (81.31) आणि किशोर जेना (80.55) हे देखील अंतिम फेरीत आपली ताकद दाखवतील. पहिल्यांदाच फायनलमध्ये तीन ॲथलीट्स अंतिम फेरीत खेळणार आहेत.

नीरज आणि अरशद वेगवेगळ्या क्वॉलिफाईंग ग्रुपमध्ये होते. नीरज अ गटात असल्याने त्याचा पात्रता फेरी पहिल्यांदा पार पडली. नीरजने या पात्रता फेरीत कमाल केली. 83 मीटर इतकं अंतर ऑटोमॅटिक क्वालिफाइंग गुण होते. नीरजने पहिल्या फेकीतच हे अंतर गाठलं. इतकंच काय तर नवी विक्रमही प्रस्थापित केलं आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याने 88.77 मीटर पर्यंत भाला फेकला. त्यानंतर भालाफेक करण्याची गरज भासली नाही. फायनलमध्ये आता ऊर्जा कामी येणार आहे.

दुसऱ्या गटात असलेल्या अरशद नदीम याने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या अरशदची सुरुवात धीमी झाली. पण त्याने नंतर चांगला वेग पकडला. पहिला थ्रो त्याने 70 मीटरपर्यंत केला. त्यानंतरच्या दोन थ्रोमध्ये अरशदने 81.53 आणि आणि 86.79 मीटरचं अंतर गाठलं आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.

अंतिम फेरीत आता नीरज चोप्रा आणि अरशद नदीम यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही भालाफेकपटूंनी 2018 च्या एशियन गेम्सपासून ऑलिम्पिक गेम्समध्ये आमनेसामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी नीरजची बाजू वरचढ राहिली आहे. पण आता दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मागच्या वर्षी कॉमनवेल्थमध्ये नीरजच्या गैरहजेरीत अरशदने गोल्ड मेडल जिंकलं होतं. तेव्हा अरशदने 90 मीटरपर्यंत अंतर गाठलं होतं.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नीरज चोप्रा हा थेट पात्र झाला आहे. या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी 85.50 मीटर लांब भाला फेकायचा होता. नीरजने 88.77 मीटर लांब फेकला. या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्याने थेट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये धडक मारली आहे.

Follow Us