
न्यूज 9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेबाबत गेल्या काही दिवसांपासून कॉर्पोरेट जगतात चर्चा रंगली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. हैदराबादच्या पुलेला गोपीचंद अकादमीत 9 मे ते 11 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडली. मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, एक्सेंचर, डॉ. रेड्डीज, विप्रो, अमेझॉन, जेनपॅक्ट, डेलॉइट, कॅपजेमिनी यासारख्या प्रमुख कंपन्यांमधील शटलर्सनी भाग घेतला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कॉर्पोरेटमधील दिग्गज खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तीव्र स्पर्धेत इन्फोसिस आणि मॉयक्रोसॉफ्टच्या खेळाडूंचा वरचष्मा दिसला. इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी चार पैकी दोन स्पर्धेत आपलं वर्चस्व दाखवलं. तर मायक्रोसॉफ्ट आणि सायकल अगरबत्ती शटलर्सनी प्रत्येकी एका स्पर्धेत विजय मिळवला.
न्यूज नाईन कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम, इन्फोसिस आणि मायक्रोसॉफ्टचे खेळाडू पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचले. रविवार, 11 मे रोजी पार पडलेल्या अंतिम फेरीत इन्फोसिसने बाजी मारली. तर मायक्रोसॉफ्टला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. फिनमार्केट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इन्फोसिसने मिश्र दुहेरीतही चमकदार कामगिरी केली. त्यांनी या ट्रॉफीवर नाव कोरलं. मिश्र दुहेरीतही मायक्रोसॉफ्ट उपविजेता, तर फिनमार्क तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मायक्रोसॉफ्टच्या लोहितने पुरुष एकेरी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. लोहितने अंतिम सामन्यात इन्फोसिसच्या अनुरागला हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या स्पर्धेत इन्फोसिसच्या भरतने तिसरे स्थान पटकावले.
न्यूज नाईन कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. महिलांच्या स्पर्धेत सायकल अगरबत्ती कंपनीच्या प्रतिनिधी एमएस चिन्मयीने विजेतेपद पटकावले. चिन्मयीने क्वालकॉमच्या शटलर भुल्लरला पराभूत करून विजय मिळवला. या स्पर्धेत डीपीएस नाचारमची प्रमोदा तिसरी राहिली. या स्पर्धेमुळे कॉर्पोरेट जगतात उत्साहाचं वातावरण होतं. नवं व्यासपीठ मिळाल्याने न्यूज 9 ने घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं. भाग घेतलेले सर्वच खेळाडू आता पुढच्या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत.