कांस्य पदक जिंकल्यानंतर स्वप्निल कुसाळेने बरंच काही सांगितलं, धोनीचा उल्लेख करत म्हणाला..

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक पदकाची भर पडली आहे. स्वप्निल कुसाळेने अचूक निशाणा लावला आणि भारताच्या पारड्यात कांस्य पदक पडलं. पहिल्यांदाच भारताला मेन्स 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक मिळालं. त्यानंतर स्वप्निल कुसलने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच महेंद्रसिंह धोनीसोबतचं खास कनेक्शन सांगितलं.

कांस्य पदक जिंकल्यानंतर स्वप्निल कुसाळेने बरंच काही सांगितलं, धोनीचा उल्लेख करत म्हणाला..
| Updated on: Aug 01, 2024 | 3:01 PM

पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी भारताच्या पारड्यात आणखी एक पदक पडलं. महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने अचूक निशाणा साधला. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये तिसरं स्थान पटकावलं. स्वप्निलने एकूण 451.4 गुणांची कमाई केली आणि कांस्य पदक नावावर केलं. भारताच्या खात्यात स्वप्निलच्या कामगिरीनंतर तिसरं पदक पडलं आहे. भारताने पहिल्यांदाच एका पर्वात शूटिंगमध्ये तीन पदकं मिळवली आहेत. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात भारताने शूटिंगमध्ये सातवं पदक मिळवलं आहे. राज्यवर्धनसिंह राठौड (रजत, 2004), अभिनव बिंद्रा (गोल्ड, 2008), गगन नारंग (कांस्य, 2008), विजय कुमार (रजत, 2012), मनु भाकर (कास्य, 2024), मनु भाकर-सरबजोत सिंह (कांस्य, 2024), स्वप्निल कुसाळे (2024, कांस्य) पदक मिळवलं आहे.

स्वप्निल कुसाळेने पदक जिंकल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पदक जिंकल्यानंतर खूप आनंदी आहे. मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत त्या सर्वांचे आभार मानतो. सामन्यात प्रेशरपेक्षा भारतासाठी कायतरी करायचं हेच मनात सुरु होतं. त्यासाठी तशीच मेहनत घेतली. माझं लक्ष फक्त ध्येयाकडे होतं. सुरुवातीच्या फेरीचे काही आकडे पाहिले. पण त्यानंतर आकड्यांकडे लक्षच दिलं नाही. फक्त आणि फक्त मी ध्येयाकडे फोकस केलं. त्यामुळे कोणत्या पोझिशनला होतो आणि काय झालं याकडे लक्ष नव्हतं. या सामन्यात मला जे काही सर्वोत्तम देता येईल ते दिलं.’, असं स्वप्निल कुसाळे याने जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला.

स्वप्निल कुसाळे हा महेंद्रसिंह धोनीचा चाहता आहे. त्यामुळे धोनीचा संदर्भ घेत पत्रकाराने स्वप्निलला प्रश्न विचारला. महेंद्रसिंह धोनीकडून काय प्रेरणा घेतली का? तेव्हा कुसाळेने सांगितलं की, ‘कितीही प्रेशर असलं तरी धोनी मैदानात एकदम शांत असतो. त्याच्याकडून मला प्रेरणा मिळाली. रायफल शूटिंग सामन्यातही मी शांत होतो. माझं लक्ष्य फक्त ध्येयाकडे होतं. महेंद्रसिंह धोनीचा शांतपणा अंगिकारला.’त्यानंतर पत्रकाराने त्याला लॉस अँजेलिसमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेबाबत विचारलं. तेव्हा स्वप्निलने सांगितलं की, ‘नक्कीच, माझं लक्ष ध्येयाकडे असेल.’ नेमबाज गगन नारंग याने स्वप्निल कुसाळेला पदक मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. इतकंच काय तर त्याच्या डोळ्यातून अश्रुही आले. त्यावर बोलताना स्वप्निल म्हणाला की, ‘गगन नारंगने प्रेरणा दिली. त्याच्याकडून कायमच पाठिंबा मिळाला आहे.’