Kho Kho World Cup 2025 : भारतीय महिला खो खो वर्ल्ड चॅम्पियन, अंतिम सामन्यात नेपाळवर मात

Womens Kho Kho World Cup 2025 Final Match Result : वूमन्स टीम इंडियाने अंतिम सामन्यात शेजारी नेपाळवर मात करत पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे.

Kho Kho World Cup 2025 : भारतीय महिला खो खो वर्ल्ड चॅम्पियन, अंतिम सामन्यात नेपाळवर मात
India Womens Won Kho Kho World Cup 2025
Image Credit source: Kho Kho World Cup
| Updated on: Jan 19, 2025 | 8:33 PM

क्रीडा वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाने पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत रविवारी 19 जानेवारीला हा महाअंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने नेपाळवर 38 पॉइंट्सच्या फरकाने नेपाळचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने या स्पर्धेत सलामीच्या सामन्यापासून धमाकेदार कामगिरी सुरु ठेवली होती. टीम इंडिया तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली नेपाळला 78-40 अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं.

महिला ब्रिगेडचं अभिनंदन

महिला खो खो वर्ल्ड कप स्पर्धेला 13 जानेवारीपासून इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरुवात झाली. टीम इंडियाने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 176 पॉइंट्सच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने त्यानंतर अशीच कामगिरी अंतिम सामन्यापर्यंत सुरु ठेवली आणि वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचं या वर्ल्ड कप विजयानंतर साऱ्याच स्तरातून सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडिया अंतिम सामन्यात नेपाळकडून कडवं आव्हान मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. कारण नेपाळच्या गोटातही तोडीसतोड खेळाडू आहेत. मात्र टीम इंडियाने पहिल्या सत्रापासूनच पकड मिळवली. टीम इंडियाने पहिल्या सत्रात अटॅक केला आणि डिफेन्समध्ये नेपाळच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांचा फायदा घेत 34-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली.

महिला टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

दुसऱ्या सत्रात नेपाळची अटॅक करण्याची वेळ होती. नेपाळने खातं उघडलं. मात्र टीम इंडियाच्या डिफेंडर्सने नेपाळला सहजासहजी पॉइंट्स दिले नाहीत. नेपाळला पॉइंट्ससाठी संघर्ष करायला भाग पाडलं. त्यामुळे दुसर्‍या सत्रापर्यंत 35-24 असा स्कोअर होता.

तिसऱ्या सत्रात निर्णायक आघाडी

तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने अटॅक केला. टीम इंडियाची संथ सुरुवात झाली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने टॉप गिअर टाकला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर हा 73-24 असा झाला. टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली. त्यामुळे नेपाळसाठी आता कमबॅक करणं अवघड होतं. चौथ्या सत्रात नेपाळच्या खेळाडूंना काही खास करता आलं नाही. टीम इंडियाने अशाप्रकारे अखेरीस 78-40 अशा फरकाने सामना जिंकला आणि इतिहास घडवला.