
क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा निकाल लागला आहे. सोलापूरच्या वेताळ शेळके याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली आहे. वेताळ शेळके यासह 66 व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. वेताळने अंतिम सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी या गदेवर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेच्या या विजयानंतर सोलापुरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहेत. तसेच वेताळचं सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं आयोजन हे अहिल्यानगरमधील दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानात करण्यात आलं होतं. महाअंतिम सामना पाहण्यासाठी असंख्य कुस्तीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांनीही उपस्थिती लावली होती. मानाच्या गदेसाठी पृथ्वीराज आणि वेताळ या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र अखेरीस वेताळ सरस ठरला. वेताळने पृथ्वीराजला अस्मान दाखवलं आणि मानाची गदा पटकावण्यात यशस्वी ठरला. तर पृथ्वीराजला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.
“वेताळला कष्ट करुन सांभाळलं. लोकांच्या शेतात कामाला जात होतो. आमची परिस्थिती बेताची होती. कष्ट केलं, कष्टाचं चीज झालं. त्यामुळे आनंद झालाय”, अशी प्रतिक्रिया वेताळच्या आईने दिली. आपल्या मुलाच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना वेताळच्या मातोश्री भावनिक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले.
शाब्बास वेताळ!!!
वेताळ शेळके ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी!
महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके याचं मनःपूर्वक अभिनंदन!!!
आक्रमक लढत दिल्याबद्दल उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याचंही अभिनंदन!#महाराष्ट्र_केसरी_२०२५ | #महाकेसरी | #MaharashtraKesari | pic.twitter.com/TK4BYJUcpS— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 30, 2025
दरम्यान या विजयानंतर स्थानिक आमदार रोहित पवार यांनी वेताळ शेळके यांचं अभिनंदन केलं आहे. रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेताळसोबतचे फोटो पोस्ट करत त्याचं अभिनंदन केलंय.