कबड्डीच्या मैदानात भाई जगतापांची सचिन अहिरांवर मात

| Updated on: Aug 25, 2019 | 11:19 PM

मुंबई शहर कबड्डी असोसिएशन कार्यकारी समितीची पंचवार्षिक निवडणूक (2019-2024) चांगलीच रंगली. अखेर भाई जगताप यांच्या पॅनलने यात सचिन अहिर यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला. जगताप यांच्या पॅनलने कार्यकारी समितीच्या सर्वच्या सर्व 25 जागांवर विजय मिळवत अहिर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.

कबड्डीच्या मैदानात भाई जगतापांची सचिन अहिरांवर मात
Follow us on

मुंबई : मुंबई शहर कबड्डी असोसिएशन (Mumbai Kabaddi Association) कार्यकारी समितीची पंचवार्षिक निवडणूक (2019-2024) चांगलीच रंगली. अखेर भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या पॅनलने यात सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला. जगताप यांच्या पॅनलने कार्यकारी समितीच्या सर्वच्या सर्व 25 जागांवर विजय मिळवत अहिर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.

विजयानंतर भाई जगताप यांनी या निवडणुकीत कबड्डी हा खेळ जिंकल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या खेळासाठी आम्ही 15 वर्षे मेहनत घेतली. कधीही त्यात राजकारण येऊ दिलं नाही. मात्र, काही नतद्रष्ट लोकांनी याची वाट लावली होती. त्यांना सर्व कबड्डीप्रेमीनी सडेतोड उत्तर दिलं आहे.”

यावेळी जगताप यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर खेळात राजकारण आणल्याचा आरोप केला. तसेच कबड्डीप्रेमींनी त्यांना त्यांची जागा दाखवल्याचाही टोला लगावला. आता कबड्डीसाठी पुढे काय या प्रश्नावर भाई जगताप म्हणाले, “आता ऑलिम्पिकमध्ये कबड्डी जाण्यासाठी आणि भारतासाठी कबड्डीत ऑलम्पिक पदक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात शिवसेनेकडून सचिन अहीर मैदानात उतरले होते. अहीर यामध्ये उतरल्याने जगताप यांना मोठे आव्हान निर्माण झाले होते. सचिन अहीर आधी राष्ट्रवादीत होते. त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 78 जणांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेकडून तोडणकर गट, तर काँग्रेसकडून जाधव गट अशी ही लढाई होती. तोडणकर गटाकडून सचिन अहिर आणि जाधव गटाकडून भाई जगताप अध्यक्ष पदासाठी मैदानात होते. या असोसिएशनचे 498 सदस्य आहेत.

गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकारी समिती सदस्यांनी अमोल कीर्तिकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड केली. त्यामुळं शहर आणि उपनगर संघटनेवर शिवसेनेचं वर्चस्व आणायचा प्रयत्न शिवसेनेकडून केला गेला. मात्र, भाई जगताप यांनी सचिन अहिरांचा हा डाव उधळून लावला.