
पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सीमेवरील बिघलेल्या परिस्थितीचा फक्त देशावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही परिणाम झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या रोमहर्षक सीरीजवर संकट घोंगावत आहे. अरगुन जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंचा जीव गमवावा लागला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानसोबत खेळण्यास दिला नकार
पुढील महिन्यात म्हणजेच 17 ते 29 नोव्हेंबर या काळात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये पाकिस्तानमध्ये तिरंगी सीरिजमध्ये लढत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होती, या सीरिजमध्ये तीन संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार होते. विशेष म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी उद्घाटनाच्या दिवशी पाक वि अफगाणिस्तानचा संघ आमने-सामने येऊन खेळणार होता. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी दुसरा सामना होणार होता. पण आता एसीबी (अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ) नकारानंतर संपूर्ण मालिकेवरच संकट घोंगावत आहे.
दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आधीच अतिशय नाजूक टप्प्यावर पोहोचले असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा वाद आणि इतर मुद्दे शिगेला पोहोचले असतानाच या तिरंगी मालिकेची घोषणा करण्यात आली होती.
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून भारत हा पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकांपासून दूर राहिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-2013 साली खेळली गेली होती, तेव्हा पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. तर टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तानचा दौरा 2005-2006 साली केला होता. आता या यादीत अफगाणिस्तानचाही समावेश झाला आहे. अफगाणिस्तानचे संघानेही पाकसोबत खेळण्यास ठाम नकार दिला आहे.
पाकिस्तानचं होणार मोठं नुकसान ?
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. जर ही तिरंगी मालिका पूर्णपणे रद्द झाली तर पीसीबीचे कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते.