आय रिटायर! पी. व्ही. सिंधूच्या ‘त्या’ ट्विटने जगभरातील चाहते गोंधळले!

| Updated on: Nov 02, 2020 | 6:22 PM

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी भारताची सुवर्णकन्या, स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याची बातमी आज दुपारी सोशल माध्यमांवर व्हायरल झाली. मात्र, ही सिंधू निवृत्त होत नसून तिने फिरकी घेतल्याचं स्पष्ट झाल्याने तिचे चाहते मात्र चांगलेच गोंधळून गेले.

आय रिटायर! पी. व्ही. सिंधूच्या त्या ट्विटने जगभरातील चाहते गोंधळले!
भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू एका ट्विटमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. सिंधूने 'आय रिटायर' असं लिहीत क्षणार्धासाठी चाहत्यांना धक्का दिला. मात्र, तिची पूर्ण पोस्ट वाचल्यावर चाहत्यांनी सूटकेचा श्वास घेतला.
Follow us on

नवी दिल्ली: जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी भारताची सुवर्णकन्या, स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याची बातमी आज दुपारी सोशल माध्यमांवर व्हायरल झाली. डेन्मार्क ओपन ही माझी अखेरची संधी होती. आय रिटायर (मी निवृत्त होतेय) असं ट्विट करत सिंधूने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी तिने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. मात्र, याच ट्विटमध्ये सर्वात शेवटी तिने आपण निवृत्त होत नसून आशिया ओपनमध्ये भाग घेण्यासाठी जोमाने प्रयत्न करत असल्याचं सांगून चाहत्यांंना सुखद धक्का दिला आहे. सिंधूने अचानक घेतलेल्या या फिरकीमुळे तिच्या चाहत्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली होती.  (PV Sindhu’s “I Retire” Post On Social Media Sends Shockwaves)

सिंधूने एका ट्विटमध्ये तीन पोस्ट शेअर करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. तिने ट्विटमध्ये भला मोठा मेसेज टाकून ही घोषणा केल्याने तिचे चाहते बुचकळ्यात पडले. मात्र, नंतर संपूर्ण पोस्ट वाचल्यानंतर सिंधू निवृत्त होत नसून तिने लक्ष वेधण्यासाठी आपली फिरकी घेतल्याचं लक्षात आल्यावर तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

पहिल्या पोस्टमध्ये डेन्मार्क ओपन ही माझी अखेरची संधी होती. आता मी निवृत्त होत आहे, असं तिने म्हटलं आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टमध्ये तिने तिच्या मनातील भावना सविस्तरपणे शब्दब्ध केल्या आहेत. माझ्या मनातील भावना स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडाव्यात असा विचार माझ्या मनात सुरू होता. पण हा विचार मांडताना मला बराच संघर्ष करावा लागला. बरंच काही चुकीचं वाटतंय. म्हणून मी तुमच्यासमोर या भावना मांडत आहे, असं तिनं म्हटलं आहे.

कदाचित ही पोस्ट वाचून तुम्ही गोंधळून जाल. तुम्हाला आश्चर्यही वाटेल. पण तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला माझं म्हणणं पटेल आणि तुम्ही त्याला पाठिंबा द्याल, अशी आशा आहे, असंही तिने म्हटलं आहे. त्यानंतर तिने या पोस्टमध्ये देशातील कोरोना संकटाचाही उल्लेख केला आहे. जगभरातील लोकांचे कोरोनाकाळातील मनोगतं वाचल्यानंतर प्रचंड वेदना झाल्याचं तिने नमूद केलं आहे. ट्रेनिंग घेऊन मी स्वत:ला मजबूत करू शकते. पण सर्वात मोठा दुश्मन असलेल्या कोरोनाला हरवणं कसं शक्य झालं असतं?, असं सांगतानाच डेन्मार्क ओपनमध्ये मला भारताचं प्रतिनिधीत्व करता आलं नाही. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे मी अस्वस्थ होते. त्यामुळेच मी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नकारात्मकता, भीती आणि अनिश्चिततेपासून संन्यास घेत आहे. अज्ञात गोष्टीवरील नियंत्रण ठेवण्यात येत नसल्याने पूर्णपणे संन्यास घेत आहे, असं तिने म्हटलंय. दरम्यान, आशिया ओपनमध्ये भाग घेण्यासाठी पूर्णपणे तयारी करत असल्याचंही तिने म्हटलं आहे.

डेन्मार्क ओपनमध्ये भाग घेऊ शकले नाही. पण मला प्रशिक्षण घेण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. जेव्हा जिंदगी तुमच्या मागे धावते तेव्हा तुम्हाला दुप्पट ताकदीने उभं राहावं लागतं. आता आशिया ओपनसाठी मी असं करेन. जोरदार संघर्ष केल्याशिवाय मी हार मानणार नाही, असं तिने म्हटलं आहे.

 

सिंधूने अत्यंत गुढ पद्धतीने ही पोस्ट लिहिली. सुरुवातीलाच तिने आय रिटायर अशी ठळक अक्षरात पोस्ट लिहिल्याने सुरुवातीला सर्वांना ती रिटायर होते की काय असं वाटलं. मात्र, नंतर आशिया ओपनसाठी आपण कठोर मेहनत घेत असल्याचं हे सांगण्यासाठी आणि कोरोना व्हायरस आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी तिने हे ट्विट करून सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याचं लक्षात आल्याने तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (PV Sindhu’s “I Retire” Post On Social Media Sends Shockwaves)

संबंधित बातम्या:

तू देशाची शान आहेस, मोदींकडून पी. व्ही. सिंधूचं कौतुक

पी.व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी

(PV Sindhu’s “I Retire” Post On Social Media Sends Shockwaves)