Rishabh Pant : 3 वर्षांपासून भटकतोय, ऋषभ पंतचं दु:ख, रात्री 1 वाजता थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऋषभ पंतने उत्तराखंडमध्ये स्वतःचे घर बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे. दिल्लीतून उत्तराखंडमध्ये स्थलांतरित होण्याची त्याची इच्छा आहे. गेल्या तीन वर्षांपासून जमीन खरेदीत अडचणी येत असल्याने त्याने पुष्कर सिंह धामी यांना टॅग करून ही विनंती केली आहे.

Rishabh Pant : 3 वर्षांपासून भटकतोय, ऋषभ पंतचं दु:ख, रात्री 1 वाजता थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ऋषभ पंतची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली
Image Credit source: social media
| Updated on: Aug 08, 2026 | 4:52 PM

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या पंतचा खेळ तर सर्वांनीच पाहिला आहे. त्याचे अनेक चाहतेही आहेत. मात्र आता ऋषब पंतने,  आपल्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाची इच्छा सार्वजनिकरित्या व्यक्त केली आहे. गेल्या बऱ्याच काळापासू उत्तराखंडमध्ये स्वतःचं घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऋषभ पंतने थेट मुख्यमंत्र्यांकडेच मदत मागितली आहे.  त्याने काल मध्यरात्री 12.45 च्या सुमारास X ( पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना टॅग केलं. या पोस्टमध्ये त्याने उत्तराखंडमध्ये आपला कायमस्वरूपी बेस तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या दिल्लीमध्ये असलेला आपला बेस उत्तराखंडमध्ये हलवायचा असल्याचेही त्याने स्पष्ट केलं.

दिल्लीहून उत्तराखंडमध्ये शिफ्ट व्हायचंय

गेल्या काही वर्षांपासून मी उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करून तिथे माझं घर उभारण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या प्रक्रियेत मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं  ऋषभ पंतने सांगितलं. उत्तराखंडशी आपले भावनिक नातं असल्याचे सांगताना पुढे पंतने म्हटलं की, माझं या राज्यावर खूप प्रेम आहे आणि इथेच आपलं घर असावे अशी इच्छा आहे. मात्र, कुटुंबासह राहण्यासाठी योग्य आकाराची आणि सोयीस्कर जागा अद्याप मिळालेली नाही, असं त्याने या पोस्टमध्ये नमूद केलं.

तीन वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा

ऋषभ पंतने आपल्या पोस्टमध्ये पुढे असा  दावा केला की, तो गेल्या तीन वर्षांपासून जमीन मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पुढे न्यावी, याबाबत स्पष्टता नसल्याचंही त्यानं म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री धामी यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून मदत करावी, अशी विनंती पंत याने केली.

 

माझ्या पहाडी लोकांमध्ये परत यायचंय

पंतने आपल्या पोस्टमधून उत्तराखंडशी असलेले आपले भावनिक नातंही व्यक्त केले. आपल्या ‘पहाडी लोकांमध्ये’ परतण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितलं. उत्तराखंडच्या विकासात आपला वाटा उचलण्याची आणि राज्यात काहीतरी सकारात्मक काम करण्याची इच्छा असल्याचेही पंतने नमूद केले. त्यामुळे दिल्लीऐवजी उत्तराखंडमध्ये आपला बेस तयार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असं त्याने लिहीलं.

 

विशेष म्हणजे, सरकारने जमीन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिल्यास ती जमीन सरकारने निश्चित केलेल्या दराने खरेदी करण्याची तयारी असल्याचे पंतने स्पष्ट केले. उत्तराखंडमध्ये स्वतःचं पहिलं घर उभारण्याचं ऋषभ पंतचं स्वप्न आहे. सरकारकडून आवश्यक मदत मिळाल्यास हे स्वप्न पूर्ण होऊ शकते, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी दिला रिप्लाय

ऋषभ पंतच्या या सार्वजनिक आवाहनानंतर आता उत्तराखंड सरकारकडून प्रतिक्रिया  आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ऋषभ पंतला रिप्लाय केला आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील.  ते लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील आणि नियमांनुसार शक्य ती सर्व मदत व सहकार्य करतील, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us