एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ही माझी देखील इच्छा पण.., शिवसेना नेत्याचं वक्तव्य चर्चेत
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि संघटन प्रमुख आनंद परांजपे यांनी मोठं विधान केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. परांजपे यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि संघटन प्रमुख आनंद परांजपे यांनी मोठं विधान केलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत , एक शिवसैनिक म्हणून माझी देखील इच्छा आहे. पण लोकशाहीमध्ये आकड्यांना महत्त्व असतं, महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसैनिकाला नव्हे तर प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटणं स्वभाविक आहे. असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं आहे. आनंद परांजपे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आगामी काळातल्या निवडणुका स्वबळावर की युतीमध्ये हे आत्ताच सांगायला मी काही ज्योतिषी नाही. मात्र दोन्हीसाठी शिवसेना सज्ज आहे. असं देखील यावेळी आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या की महायुतीमध्ये या संदर्भातला निर्णय एकनाथ शिंदे घेतील असंही यावेळी आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. आनंद परांजपे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला आहे. प्रत्येक बूथनिहाय शिवसेनेची ताकद असली पाहिजे, शिवसेना सज्ज असली पाहिजे या संदर्भात देखील परांजपे यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या आहेत.
दरम्यान सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये महायतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सर्वाधिक जागा जिंकत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु त्यानंतर अनेकदा शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विधानं करण्यात येत आहेत. यापूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली होती. गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता आनंद परांजपे यांनी देखील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी एक शिवसैनिक म्हणून आपली इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळातल्या निवडणुका स्वबळावर की युतीमध्ये हे आत्ताच सांगता येणार नसल्याचं देखील ते म्हणाले. आनंद परांजपे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
