
India vs South Africa : टीम इंडियात आपलं स्थान पक्क करण्यासाठी कुठल्याही फलंदाजाने मोठी इनिंग खेळणं आवश्यक आहे. खासकरुन भारताकडून खेळताना शतक झळकावणं प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. शतकाच्या बळावर विजय मिळाला, तर आनंद द्विगुणित होतो. पण प्रत्येकवेळी शतकामुळे विजय मिळेलच असं होत नाही. खासकरुन ऋतुराज गायकवाड शतक झळकावतो, तेव्हा पराभव ठरलेला असतो, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे सामन्यात असचं झालं. ऋतुराज गायकवाड शानदार शतकी इनिंग खेळला. पण टीमला पराभवाचा सामना करावा लागला. हे असं पहिल्यांदा झालेलं नाही.
रायपूरमध्ये 3 डिसेंबरला म्हणजे काल भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरीजमधला दुसरा सामना झाला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 358 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून विराट कोहलीने (102) सलग दुसरं शतक झळकावलं. पण ही मॅच जास्त खास बनली ते ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे. त्याने आपल्या वनडे करिअरमधील पहिलं शतक झळकावलं. ते ही 77 चेंडूत. गायकवाडने 83 चेंडूत 105 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 2 सिक्स होत्या.
हे असं पहिल्यांदा झालेलं नाही
ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे टीम इंडियाला विजय मिळेल ही अपेक्षा होती. पण निकाल दुसराच लागला. दक्षिण आफ्रिकेने चार विकेटने हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने 358 धावांचं लक्ष्य पार केलं. भारतात भारताविरुद्ध हा सर्वात मोठा रन चेज आहे. गायकवाडने शतक झळकवूनही विजय मिळाला नाही. पण हे असं पहिल्यांदा झालेलं नाही.
ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे याआधी कधी हरलोय?
गायकवाडचं इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमधील हे दुसरं शतक होतं. ही दोन्ही शतक झळकावली, तेव्हा टीम इंडियाचा पराभव झाला. याआधी 28 नोव्हेंबर 2023 रोजी गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सामन्यात गायकवाड 123 धावांची धुवाधार शतकी इनिंग खेळला होता. इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमधील त्याचं हे पहिलं शतक होतं. पण ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाच्या बळावर 223 धावांच टार्गेट चेज केलं. भारताविरुद्ध टी 20 मधील हा सर्वात मोठं यशस्वी रन चेज आहे.
IPL मध्ये सुद्धा असच घडलं
फक्त टीम इंडियाच नाही, तर IPL मध्ये सुद्धा ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर असच घडलय. IPL च्या 18 सीजनच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी 10 वेळा शतकी खेळी केली. त्यात 2 वेळा पराभव झाला. या दोन्ही सेंच्युरी ऋतुराज गायकवाडने मारल्या होत्या. त्यावेळी CSK चा पराभव झाला. IPL 2021 मध्ये ऋतुराजने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 101 धावा फटकावल्या. पण राजस्थानने 190 धावांचं लक्ष्य पार केलं. त्यानंतर IPL 2024 मध्ये गायकवाडने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 108 धावा केल्या. त्यावेळी सुद्धा लखनऊच्या टीमने 211 धावांचं लक्ष्य पार केलं.