
स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता ती तिने सांगितलेल्या तिच्या आईपणाच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. अलीकडेच आई म्हणून तिच्या आयुष्याची एक झलक तिने दाखवली. ज्यामध्ये तिने तिच्या गर्भधारणेचे, स्तनपानाच्या संघर्षांचे आणि तिच्या निवृत्तीसंदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे तसेच तिचे अनेक वैयक्तिक पैलू उलगडले.
निवृत्ती घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं
एका पॉडकास्टमध्ये तिने या सर्व विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. यावेळी तिने निवृत्ती घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं. ती म्हणाली की “माझ्या शरीरानं मला न खेळण्याचे संकेत दिले होते, पण त्याव्यतिरिक्त मला माझ्या मुलासोबत जास्त वेळ घालवायचा होता” ती पुढे म्हणाली की, “मी मागे हटण्याचे एक मुख्य कारण म्हणजे माझ्या मुलाला अधिक वेळ देणे. तो आता अशा वयात आहे जिथे त्याची भावनिक स्थिरता पालकांच्या उपस्थितीवर अवलंबून असते, विशेषतः शाळा. मला त्याच्यासोबतचे वर्ष गमावल्याबद्दल पश्चात्ताप करायचा नव्हता. मी माझ्या स्वप्नांचा बराच काळ पाठलाग केला. पण माझ्या मुलासोबत वेळ घालवणं हेदेखील माझ्या स्वप्नांचाच भाग होता. तसेच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आई होणे.”
सानियाने सांगितला मातृत्वाचा अनुभव
पुढे सानियाने पहिल्यांदाच तिच्या बाळापासून वेगळे होण्याच्या भावनिक आव्हानाबद्दल सांगितलं ती म्हणाली की “मी पहिल्यांदाच इज़हानला सोडून गेले होते तेव्हा तो फक्त सहा आठवड्यांचा होता. मला दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं आणि तो सर्वात कठीण विमान प्रवास होता. मी गोंधळून गेले होते. जरी मला माहित होते की अनेक माता यातून जातात. तरीही, अपराधीपणाची भावना माझ्या मनात तीव्र होती.कधी कधी आपण स्वतःवर अनावश्यक भावनिक भार टाकतो ज्याला लोकं आता ‘मदर गिल्टी’ म्हणतात’. असं म्हणत तिने भावना मोकळ्या केल्या.
ब्रेस्टफिडिंगचा अनुभव कठीण
सानियाने आईपणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ब्रेस्टफिडिंगचा तिचा अनुभव सांगिला. ती म्हणाली की, मी सकाळची फ्लाईट घेतली आणि त्यावेळीही मी त्याला ब्रेस्टफिडिंग करत होते. त्यामुळे मला विमानातच दूध काढावं लागलं. हा सर्वात मोठा संघर्ष होता. आणि मी ती फ्लाईट घेतली. पण, आज मला फार आनंद होतोय की, मी ती फ्लाईट घेतली. कारण जर त्यावेळी मी माझा निर्णय बदलला असता, तर मला नाही वाटत की, मी माझ्या बाळाला सोडून कधी कोणतंही काम केलं असतं. मी हैदराबादहून दिल्लीला सकाळ-संध्याकाळची फ्लाईट घेतली. मी परत आले. माझं बाळ पूर्णपणे ठीक होतं. त्यावेळी मला खरंच रडू आलं.”
सानिया हा अनुभव सांगतना म्हणाली की, “मी अडीच ते तीन महिने स्तनपान केलं. माझ्यासाठी, तो गरोदरपणाचा सर्वात कठीण काळ होता. मला वाटतं, मी आणखी तीन वेळा गर्भवती होईन, पण स्तनपान? सर्वात कठीण होतं. भावनिक भार, वेळेची कमतरता, थकवा सगळंच एकत्र येतं.”