Epstein Files: शेकडो तरुणींचे फोटो,अश्लील मॅसेज, मुलींचे रेटकार्ड, एपस्टीन फाईलचा अमेरिकेच्या राजकारणात भूकंप! डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरे
Epstein Files America: अमेरिकेतील एपस्टीन फाईलमुळे राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. युरोप आणि आशियापर्यंत भूकंपाचे धक्के बसले आहेत. अनेकांची कुंडली समोर आली आहे. तरीही अनेक फोटो आणि नावं समोर न आल्याने अमेरिकेच्या न्यायविभागावर नागरिक टीका करत आहेत.

Donald Trump: अमेरिकेतील लैंगिक शोषणातील दोषी जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित फाईल्स अखेर उघड झाल्या आणि अमेरिकेच्या राजकारणात अपेक्षित भूकंप आला. त्याचे हादरे युरोप आणि आशियापर्यंत बसले. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पोप गायक मायकल जॅक्सन, राजपूत्र, इतर देशांचे काही नेते यांच्यासह जगातील अनेक मान्यवरांसोबत तरुणींचे फोटो व्हायरल झाले आहेत. तर यादरम्यान काही तरुणींच्या अंगावरील मजकूर, अश्लील संदेश, मुलींचे रेटकार्ड आणि इतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जेफ्री एपस्टीन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही चांगले मित्र होते. तर दुसरीकडे अनेकांची नावं आणि फोटो जाहीर न केल्याने अमेरिकन नागरिकांनी न्याय विभागावर टीका केली आहे. या फाईल्समधील अर्धसत्यच बाहेर आल्याचा दावा करण्यात येत आहे.
19 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्याविषयीच्या विधयेकावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर एका महिन्यात या फाईल सार्वजनिक करण्यात येणार होत्या. 19 डिसेंबर 2025 रोजी त्या सार्वजनिक झाल्या. कालपासून अमेरिकेत त्यामुळे वादळ उठलं आहे. एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरेन्सी कायदातंर्गत हजारो पानांचा दस्तावेज, शेकडो फोटो, ई-मेल्स, अश्लील संदेश, विविध देशातील तरुणींचे रेटकार्ड, काही कोड वर्ड आणि इतर मोठ्या साहित्याचा या सार्वजिक दस्तावेजात समावेश आहे. यामध्ये अनेक नामचिन लोकांचा समावेश उघड झाला आहे. आता त्यांचा लैंगिक शोषणात अथवा या देहव्यापारात प्रत्यक्ष संबंध आहे की नाही याचा खुलासा होऊ शकला नाही. पण जगातील दिग्गज अनेक तरुणींसोबत या फोटोत दिसत आहेत. यातील अनेक तरुणी या रशिया, अमेरिका आणि युरोपातील आहेत. मसाजच्या नावाखाली त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आल्याचे दिसून येते. यामध्ये लहान मुलींचे पण लैंगिक शोषण करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
ट्रम्प काय लपवत आहेत?
सिनेटचे अल्पसंख्यांक नेते चक शूमर यांनी आरोप लावला आहे की, ट्रम्प प्रशासनाने यामधील सत्य बाहेर आणले नाही. ट्रम्प प्रशासन जगाला अर्धसत्यच सांगत आहेत. एपस्टीन हा वित्तीय सल्लागार होता. त्याचे मोठे वलय होते. तो न्यूयॉर्कसह इतर शहरात नेहमी पार्टीचे आयोजन करायचा. त्यात राजकारण, समाजकारण, उद्योगविश्व आणि आर्थिक क्षेत्रातील बडे लोक सहभागी होत असत. मग याठिकाणी सुंदर तरुणींना मुद्दामहून समोर आणल्या जायचे. त्यामाध्यमातून मसाज आणि पुढे देहव्यापाराचा उद्योग केल्या जायचा. पण ट्रम्प प्रशासनाने या फाईल सार्वजनिक केल्या तरी, त्यातून अर्धसत्यच समोर आल्याचा आरोप शूमर यांनी केला आहे. याप्रकरणी नागरिक आता अमेरिकेच्या न्याय विभागावर टीका करत आहेत.
ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या
दरम्यान एपस्टीन फाईलचा काहीच भाग समोर आणल्याने आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थकही भडकले आहेत. रिपब्लिकन खासदारांनी सुद्धा या फाईल उघड करण्याची मागणी केल्याने ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आल्याची चर्चा आहे. अंशता केलेल्या खुलाशावर अनेक जण असमाधानी आहे. या फाईलमधील सर्वच माहिती जगासमोर ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. या फाईलमधील 254 मालिश करणाऱ्या महिलांची नावं आणि त्यांची फोटो, त्यांनी कोणाची मालिश केली याची माहिती समोर का आणली नाही, ती सार्वजनिक का करण्यात येत नाही असा सवाल करण्यात येत असल्याने ट्रम्प प्रशासन अडचणीत सापडले आहे.
