Shoaib Akhtar: बॉलचा आकार बदलायला आम्ही बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो…शोएब अख्तरच्या विधानाने खळबळ
Shoaib Akhtar On Ball Tampering: पाकिस्तानी माजी फलंदाज शोएब अख्तरने आता बदलत्या क्रिकेटवर आणि बॉल टेम्परिंगबद्दल एक विधान केले आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याच्या मते, क्रिकेट हळूहळू आपले आकर्षण गमावत आहे. तरुण पिढी आणि अगदी त्याची स्वतःची मुलेही पूर्वीसारखी या खेळात रस घेत नाहीत. विस्डेनच्या ‘द स्कूप’ पॉडकास्टवर बोलताना अख्तर म्हणाला की, “गेल्या २० वर्षांपासून क्रिकेटची सातत्याने घसरण होत आहे. यामागे त्याने नियमांमधील बदल आणि करिष्मा असलेल्या खेळाडूंचा अभाव ही कारणे दिली.”
शोएब अख्तर म्हणाला, “हा खेळ (क्रिकेट) मरत आहे. गेल्या २० वर्षांपासून क्रिकेट हळूहळू मरत आहे. आधुनिक क्रिकेट फलंदाजांना अनुकूल असल्याचे दिसते. सामन्यांदरम्यान दोन नवीन चेंडूंच्या वापरामुळे वेगवान गोलंदाजांचा प्रभाव कमी झाला आहे. ही चिंता केवळ नियमांपुरती मर्यादित नाही. पाकिस्तान नवीन पिढीवर प्रभाव टाकू शकणारे खेळाडू तयार करण्यात अपयशी ठरत आहे. माझा मुलगा म्हणतो, अब्बू, मला आपल्या संघात आक्रमकता दिसत नाही.'”
बॉल टॅम्परिंगवर अख्तरचे विधान
शोएब अख्तरनेही त्याच्या खेळण्याच्या दिवसांतील बॉल टॅम्परिंगबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. त्याने स्पष्ट केले की “खेळाडू चेंडूचा पृष्ठभाग बदलण्यासाठी आणि रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी बाटलीच्या झाकणांचा वापर करत असत. आम्ही इंग्लंडमध्ये बाटलीची झाकणे वापरली, सँडपेपर नाही.”
२०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या कुप्रसिद्ध बॉल टॅम्परिंग प्रकरणावर आपले मत व्यक्त करताना, या पाकिस्तानी दिग्गजाने सांगितले की “अशा गोष्टी सहसा संपूर्ण संघाला माहीत असतात. त्या केवळ एक किंवा दोन खेळाडूंपुरत्या मर्यादित असू शकत नाहीत.”
अख्तर म्हणतो की, “जर कसोटी सामने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थितीत आयोजित केले गेले, तर तो त्यासाठी $100,000 पर्यंत दान करण्यास तयार आहे. वेगवान गोलंदाजी एकेकाळी ज्या उत्साहासाठी ओळखली जात होती, तो क्रिकेटमध्ये पुन्हा निर्माण करण्याची त्याची इच्छा आहे. मी माझ्या आईला वचन दिले आहे की मी राजकारण आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डापासून दूर राहील. हे वचन पूर्ण करणार आहे मी.”