Pashudhan Bima Claim: जनावराच्या मृत्यूनंतर कशी मिळेल विमा रक्कम? जाणून घ्या क्लेम कसा करावा
Pashudhan Insurance Scheme : दुष्काळाच्या झळांमध्ये पशूधन सांभाळणे हे जिकरीचे काम झाले आहे. गंभीर आजाराने, अपघातात, विषबाधा अथवा नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावले तर विमा रक्कम कशी मिळेल? काय आहे प्रक्रिया जाणून घ्या.

Pashudhan Insurance Scheme : शेतीसोबतच दूध उत्पादनाचा जोडव्यवसाय अनेक शेतकरी करतात. पशूपालनावर काही कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. पण अनेकदा गंभीर आजार, अपघात, विषबाधा अथवा नैसर्गिक संकटात जनावर दगावते. यामुळे पशुपालकाला मोठा फटका बसतो. सध्या दुष्काळाचे सावट आहे. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. अशावेळी जनावर मालकांनी पशूधन विमा योजनेचा लाभ घेणे महत्त्वाचे ठरते. विमा काढलेला असेल तर जनावराच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मिळते. त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
जनावराचा मृत्यू झाल्यास काय कराल?
पशूधन विमा घेतला असेल आणि जनावराचा मृत्यू झाला असेल तर सर्वात अगोदर विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा. माहिती देण्यास विलंब झाल्यास दावाच्या प्रक्रियेत अडचण येऊ शकते. यामुळे पॉलिसीच्या नियमांनुसार, ठरलेल्या मुदतीत जनावर दगावल्याची माहिती देणे आवश्यक आहे. जनावराच्या कानाला लावलेला ओळख क्रमांक टॅग सुरक्षित जपून ठेवा. जवळच्या पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावराचं शवविच्छेदन करून घ्या. त्या अहवाला आधारे दावा दाखल करता येतो.
क्लेमसाठी ही कागदपत्रं आवश्यक
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पशूपालकाने काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे महत्त्वाचे आहे. विमा पॉलिसीची प्रत, भरलेला क्लेम फॉर्म, कानातील टॅगचा तपशील आणि शवविच्छेदन अहवाल अर्जासोबत जोडावा. याशिवाय पशूपालकाचे ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील आणि मृत जनावराचं छायाचित्रही जोडावे लागू शकते. पण अजून कोणती कागदपत्रं लागतील याची खातरजमा विमा कंपनीकडून करून घ्या.
ऑफलाईन-ऑनलाईन क्लेम असा करा
विमा कंपनीशी संपर्क साधून क्लेम फॉर्म घ्या. या अर्जात पशूपालकाची, जनावराची आणि मृत्यूच्या कारणाची अचूक माहिती भरून द्या. आवश्यक कागदपत्रं जमा करा. विमा कंपनी ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लेम करण्याची सुविधा देते. त्यासाठी 1962 क्रमांकावर मॅसेज अथवा NDLM या ॲपवर लॉगिन करून लाईव्ह स्टॉक इन्शुरन्स हा पर्याय निवडता येतो. नोंदणीकृत मोबाईलवरून लॉगिन केल्यानंतर माय क्लेम हा पर्याय निवडा. तिथे आवश्यक माहिती जोडा आणि कागदपत्रं अपलोड करा. तपासणीनंतर विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
