Shubman Gill: श्रीलंकेविरुद्ध जिंकलो ते फक्त दोघांमुळे…क्रेडिट देताना गिल मॅचविनरला तर विसरलाच
IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला. या विजयामागे कोण जबाबदार हे आता कर्णधार गिलने सांगितले आहे.

IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. पहिला कसोटी सामना गॉल येथे रंगला जो भारतीय संघाने तब्बल 165 धावांनी जिंकला. सामन्याच्या पाचव्या दिवशी, भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः युवा फिरकी गोलंदाज मानव सुथारने (दुसऱ्या डावात 6/55, सामन्यात 10 बळी) घातक कामगिरी केली, ज्यामुळे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 206 धावांवर गारद झाला. देवदत्त पडिक्कलच्या संस्मरणीय 167 धावांच्या खेळीने भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला. हा विजय भारतीय क्रिकेटसाठीही खूप खास आहे, कारण हा भारताचा ऐतिहासिक 600 वा कसोटी सामना होता.
सामन्यानंतर, कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, “संघाच्या 600 व्या कसोटी सामन्यातील हा विजय खूप खास आणि समाधानकारक होता. संघाला सुमारे 400 धावांची मोठी आघाडी हवी होती. हवामानाची अनिश्चितता आणि पावसामुळे, भारतीय संघाला चौथ्या डावात गोलंदाजीसाठी पुरेसा वेळ आणि षटके हवी होती, आणि फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रयत्नामुळे सुरुवातीला काही विकेट पडल्या, पण संघ मजबूत आणि सुरक्षित स्थितीत राहिला.”
कर्णधार गिलने युवा फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि फलंदाज देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीचे कौतुक केले, जे सामन्याचे खरे नायक होते. तो म्हणाला की, “मानव त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे आणि तो भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो. शतकाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करणे हेच सामन्याचे चित्र पालटते, जे देवदत्त पडिक्कलने दाखवून दिले.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे महत्त्व अधोरेखित करताना शुभमन गिल म्हणाला की, “कसोटी सामना जिंकणे कधीही सोपे नसते आणि गॉलसारख्या मैदानावर जिंकणे ही एक खूप सुखद भावना आहे. डब्ल्यूटीसी ट्रॉफी जिंकणे हे भारतीय संघाचे प्राथमिक आणि अंतिम ध्येय आहे आणि ते साध्य करण्यासाठी संपूर्ण संघ एकत्रितपणे काम करत आहे.” या विजयामुळे भारताने डब्ल्यूटीसी क्रमवारीमध्ये आपल्या गुणांची टक्केवारीही सुधारली आहे. गिलने दोन खेळाडूंना क्रेडिट दिले पण दुसऱ्या डावात ऋषभ पंतनेही अर्धशतकाच्या जोरावर 66 धावा केल्या त्याचे कौतुक गिलने केले नाही.