Womens Asia Cup 2026: टीम इंडियातील त्या एकटीने आमचा गेम केला, आशिया कपमधील पराभवानंतर श्रीलंकेची कॅप्टन काय म्हणाली?
IND W vs SL W: भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप २०२६चा फायनल सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टूने भारतीय संघाच्या विजयावर एक विधान केले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला ७२ धावांनी पराभूत करून इतिहास रचला. या सामन्यात श्रीलंकेचा संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय वाघिणींनी संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. आता भारतीय संघाने आशिया कपची ट्रॉफी जिंकल्यानंतर श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टूने केलेल्या विधानाची आता चर्चा होत आहे.
श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टू म्हणाली की ” हा खेळाचाच एक भाग आहे, एक संघ जिंकतो आणि एक हरतो. विशेषतः पॉवरप्लेमध्ये आमच्या गोलंदाजीची कामगिरी संघर्षपूर्ण राहिलेली दिसली. पण शेवटी, आम्ही तिन्ही विभागांमध्ये आमचा सर्वोत्तम खेळ केला नाही. भारतीय संघ खूप छान खेळला पण आम्ही पुनरागमन करू. आशियाई खेळ येत आहेत आणि आम्ही परत येऊ. आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगला क्रिकेट खेळलो, पण आज आम्हाला थोडी अडचण आली. याचा अर्थ असा नाही की आम्ही चांगले नाही. अनेक [सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या] खेळाडूंनी चांगला क्रिकेट खेळला. विशेषतः हर्षिता, नीलाक्षी आणि प्रबोधा.”
चामरी अटापट्टूने पॉवरप्लेचा उल्लेख केला म्हणजे तिच्यामते भारतीय संघाच्या दोन फलंदाज श्रीलंका संघावर भारी पडल्या. पॉवरप्लेमध्ये भारताकडून दोन फलंदाजांनी श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी पॉवरप्ले गाजवला. विशेषत: शफालीने पॉवरप्लेमध्ये पॉवरफुल कामगिरी केली. यामुळे बहुदा चामरी अटापट्टच्या मते श्रीलंकन संघावर शफाली एकटी भारी पडली असावी.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय डावाच्या सुरुवातीपासूनच या दोन्ही सलामीवीरांनी श्रीलंकेच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी अवघ्या ७७ चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची शतकी भागीदारी केली.
यादरम्यान, शफाली वर्माने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. यादरम्यान, शफालीने २४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून इतिहास रचला. टी२० आशिया कपच्या इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. दरम्यान, मंधानानेही आपली लय पकडला आणि ३५ चेंडूंमध्ये आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३६ वे अर्धशतक पूर्ण करत एकूण ५९ धावा केल्या. शेवटच्या षटकात, जी. कमलिनीने ५ चेंडूंमध्ये नाबाद १५ धावा करून भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.