Sunil Gavaskar: सिराज सोडा पण त्याची कमी जास्त भासणार…भारताची Playing Xi पाहताच गावस्कर भडकले
Sunil Gavaskar On Team India Playing Xi: भारत न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून दुसरा कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्याची प्लेइंग इलेव्हन पाहाताच सुनील गावस्करांनी एक गंभीर प्रश्न विचारला आहे.

IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपला मित्र गुरनूर ब्रारला पदार्पण दिले. या सामन्यासाठीही मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. आता या गावस्करांनी एक विधान केले आहे.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी रवींद्र जडेजाला संघातून वगळण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, फिरकी गोलंदाजांना कमी मदत मिळण्याची शक्यता असलेल्या खेळपट्टीवर या अनुभवी अष्टपैलू खेळाडूची गोलंदाजी उपयुक्त ठरली असती. भारताच्या संघ निवडीवरून वाद निर्माण झाला आहे, कारण वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्यात आले आहे.
गावस्कर यांच्या मते जडेजाला वगळण्याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. ते असेही म्हणाले की, “जडेजा कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी प्रभावी ठरला असता. सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) चक्रात जडेजा हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. ठीक आहे, आपण फक्त सिराजबद्दल बोलत आहोत, पण जडेजाचं काय? तो या विश्वचषक चक्रात भारताचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. मला वाटतं, चौथ्या आणि पाचव्या दिवशी त्याची फिरकी खूप उपयुक्त ठरली असती. तो सपाट खेळपट्ट्यांवरही चेंडूवर पकड मिळवून त्याला वळवण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे, मोहम्मद सिराजसोबतच त्याच्यासाठीही हे दुर्दैवी आहे,”
“मी याकडे नेहमीच अशा दृष्टीने पाहतो की अंतिम ११, १४ किंवा १६ खेळाडूंबद्दल तुमच्या मनात काहीही शंका असल्या तरी, एकदा संघ निवडला गेला की तो तुमचा आणि माझा असतो. शेवटी, हा भारतीय संघ आहे. त्यामुळे, मी या संघाला पाठिंबा देत आहे आणि प्रार्थना करतो की या संघाने चांगली कामगिरी करावी.”असं गावस्कर म्हणाले.
