
T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर-8 राऊंडचा पहिला सामना खेळताना टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेने या सामान्यात भारताचा 76 धावांनी दारुण पराभव केला. त्यामुळे सेमीफायनल प्रवेशाच टीम इंडियासाठी पुढचं गणित अवघड बनलय. पराभवासह रविवारच्या सामन्यात अक्षर पटेलला वगळलं, त्याची सुद्धा भरपूर चर्चा आहे. कारण अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. अक्षर पटेलला वगळून त्याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही. आता झिम्बाब्वे विरूद्धच्या पुढच्या सामन्याआधी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यासाठी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. पण त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरला ड्रॉप करण्याऐवजी अर्शदीप सिंहला टीममधून वगळा असं सुचवलं आहे. म्हणजे अर्शदीपच्या जागी अक्षर पटेलला खेळवा असं सुनील गावस्करांचं मत आहे. “झिम्बाब्वेच्या बॅटिंग लाइन अपमध्ये फार लेफ्टी बॅट्समन नाहीयत. त्यामुळे अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा सल्ला मी देईन. अर्शदीपच्या जागी तुम्ही त्याला आणू शकता” असं गावस्कर जियोस्टारवर बोलताना म्हणाले
भारताचे सहाय्यक कोच काय म्हणाले?
“अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे जो चांगल्या रिदममध्ये आहे, त्याला बदलावं असं तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे कदाचित बदल न करता ते त्याची टीमने खेळतील” असं गावस्कर यांनी म्हटलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलबद्दल निर्णय हा रणनितीक गरजेनुसारच घेतला होता असं भारताचे सहाय्यक कोच रायन टेन आणि बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी स्पष्ट केलं. “प्लेइंग इलेव्हन काय असावी? या बद्दल आम्ही दोन दिवस चर्चा केली. त्यावेळी रिंकू सिंह आम्हाला आठवा फलंदाज म्हणून हवा होता. निर्णय त्या आधारावर घेतला” असं रायन टेन मॅच नंतर पत्रकार परिषदेत म्हणाले. सेमीफायनल प्रवेशासाठी टीम इंडियाला आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. ते ही चांगला रनरेट राखून.