
टी20 वर्ल्डकप (T20 world Cup) पूर्वीच भारत ( India)आणि बांगलादेशमधील (Bangladesh) क्रिकेट संबंधांत तणाव स्पष्ट जाणवू लागला आहे. अलिकडच्या घटनांमुळे हा वाद आणखी वाढला आहे, ज्याचा परिणाम आता थेट आयसीसी स्पर्धेवर होत असल्याचे दिसत आहे. भारतात सामने खेळण्यास टीम कम्फर्टेबल नसल्याचे बांगलादेशकडून संकेत देण्यात आले असून त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.
का वाढला वाद ?
खरं तर, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात खूप संतापाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला खरेदी केल्यामुळेही मोठा वाद झाला, त्याला बराच विरोधही झाला. देशात तसेच सोशल मीडियावरील वाढत्या दबावानंतर, बीसीसीआयने केकेआर फ्रँचायझीला कडक सूचना दिल्याने, अखेर केकेआर टीमला मुस्तफिजूरला सोडावे लागले. या निर्णयाने परिस्थिती आणखी चिघळली.
ICC काय पर्याय ?
त्यानतंर आता बांगलदेशच्या टीमने भारतात न येण्याची भूमिका घेतली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आयसीसीकडे अनेक पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे बांगलादेशची मागणी मान्य करणे आणि त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करणे. यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक बदलेल आणि लॉजिस्टिकची आव्हाने वाढतील.
दुसरा पर्याय असा की, आयसीसीच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करणं. जर बांगलादेशने भारत दौऱ्यावर येण्यास नकार दिला तर त्यांचे सामने रद्द मानले जाऊ शकतात आणि विरोधी संघांना वॉकओव्हरद्वारे गुण मिळू शकतात. क्रिकेटच्या इतिहासात हे यापूर्वीही घडले आहे. 1996 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या टीमने सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला, त्यानंतर श्रीलंकेला थेट गुण देण्यात आले. 2003 सालच्या वर्ल्डकरमध्ये देखील इंग्लड आणि न्यूझीलंडच्या संघानेकाही सामने खेळले नव्हते आणि विरोधी संघाला त्याचा फायदा मिळाला होता.
बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली तर ?
जर बांगलादेशने संपूर्ण टी-20 वर्ल्डकपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला तर सर्वात टोकाची परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत, आयसीसी दुसऱ्या पात्र संघाला त्यांच्या जागी समाविष्ट करू शकते. यापूर्वी 2016 साली अंडर-19 वर्लडकप मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यावर आयर्लंडच्या संघाला संधी मिळाली होती.
बांगलादेशने अद्याप अधिकृतपणे टी20 वर्ल्ड कपमधूनन माघार घेण्याचा निर्णय घेतलेला नाही, परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे या स्पर्धेपूर्वीच वातावरण बरंच तापले आहे. या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या मुद्द्यावर आयसीसी काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.