
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेला पाचवा कसोटी सामना एका निर्णायक वळणावर आहे. ओव्हल कसोटीचा निकाल टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण इंग्लंडकडे हा कसोटी सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याची संधी आहे. दुसऱ्याबाजूला इंग्लंडला विजयापासून रोखून मालिकेत बरोबरी साधण्याची टीम इंडियाकडे संधी आहे. त्यामुळे इंग्लंडपेक्षा भारतासाठी या सामन्याचा निकाल जास्त महत्त्वाचा आहे. उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे. भारताला विजयासाठी 3 विकेटची तर इंग्लंडला जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. म्हणजे उद्या जी टीम सर्वोत्तम प्रदर्शन करेल, विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार हे निश्चित आहे. काल पाऊस आणि खराब प्रकाशामुळे शेवटच्या सेशनमधील दीड तासाचा खेळ होऊ शकला नाही.
टीम इंडियाने मागच्या 93 वर्षांच्या आपल्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा कधी पाच सामन्यांची टेस्ट सीरीज खेळण्यासाठी परदेश दौरा केला, तेव्हा कधीही पाचवा कसोटी सामना जिंकलेला नाही. ओव्हलवर सुरु असलेला कसोटी सामना भारत-इंग्लंड सीरीजमधला पाचवा कसोटी सामनाच आहे. टीम इंडिया नवीन इतिहास लिहिणार की, जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? ते आज समजेल.
दोन्ही टीमकडे इतिहास रचण्याची संधी
ओव्हल टेस्टमध्ये भारत आणि इंग्लंडपैकी जो कोणी जिंकेल, तो नवीन इतिहास रचेल. 374 धावांचा पाठलाग करणारी इंग्लंडची टीम असो किंवा डिफेंड करणारी भारतीय टीम. ओव्हलच्या 123 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कधीही 374 धावांच टार्गेट चेस झालेलं नाही. म्हणजे इंग्लंडच्या टीमने हे लक्ष्य गाठलं, तर ओव्हल मैदानात ते एक नवीन इतिहास रचतील. टीम इंडियाने इंग्लंडला 374 धावांच्या आधी ऑलआऊट केलं, तर परदेश भूमीवर सीरीजमधला पाचवा कसोटी सामना जिंकून नवीन इतिहास रचतील.
कॅप्टन गिलने काय नारा दिलेला?
भारतीय टीमचा कॅप्टन शुबमन गिलने ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी एक घोषणा केलेली. ‘एक तास जोर लावू नंतर सगळे सोबत आराम करु’. चौथ्या दिवशी ही घोषणा पूर्ण झाली नाही. पण आज पाचव्यादिवशी सुरुवातीच्या तासाभरात टीम इंडियाने जोर लावला, तर कॅप्टन गिलची सर्वांनी मिळून सोबत आराम करण्याची इच्छा पूर्ण होईल. टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधता येईल आणि नवीन इतिहास रचला जाईल.