Naseem Shah : धक्कादायक! संपूर्ण कुटुंब घरात असताना प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या घरावर अंदाधुंद गोळीबार

पाकिस्ततान क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या घरावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. पाकिस्तानमधील लोअर दिर परिसरातील त्याच्या घरावर हा गोळीबार झाला आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नसून पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

Naseem Shah : धक्कादायक! संपूर्ण कुटुंब घरात असताना प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या घरावर अंदाधुंद गोळीबार
क्रिकेटर नसीम शाह
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2025 | 1:37 PM

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह एकीकडे टीमसोबत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या तयारीत व्यस्त असताना त्याच्या पाकिस्तानमधील घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. सोमवारी सकाळी खैबर पख्तूनख्वा इथल्या लोअर दीर जिल्ह्यातील मयार भागात अज्ञात हल्लेखोरांनी नसीमच्या घरावर गोळीबार केला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला केला आणि त्यानंतर ते तिथून पळून गेले. या गोळीबारात घराबाहेर पार्क केलेल्या एका कारचं नुकसान झालं आणि घराच्या खिडक्या फुटल्या. सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नसीमच्या घराच्या मुख्य दरवाजावर गोळ्यांचे निशाण दिसून आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नसीम शाहचा जन्म 2003 मध्ये याच घरात झाला होता. तिथूनच त्याने आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीची सुरुवात केली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात घराचा मुख्य गेट, खिडक्या आणि एका वाहनाचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी घटनास्थली पोहोचून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी त्यांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. स्थानिकांच्या मते, नसीम शाहचे कुटुंबीय अत्यंत शांतताप्रिय आहेत. त्यांचं कोणाशीही वैर नाही. या घटनेनंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसर आणि नसीमच्या घराभोवती सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले असले तरी नंतर मयार पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

गोळीबाराच्या या घटनेनंतरही नसीम शाहने पाकिस्तान क्रिकेट संघासोबत सामना खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्याच्या वडिलांनी लोअर दीर जिल्हा पोलीस अधिकारी तैमूर खान यांची भेट घेतली आहे. नसीम शाह सध्या रावळपिंडी इथं सुरू असलेल्या पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहभागी होत आहे. पाकिस्तान क्रिकेट टीममधील तो महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.

दरम्यान लोअर दीर किंवा खैबर पख्तूनख्वा गुन्हेगारीमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2011 मध्ये लोअर दीरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती. त्यामध्ये 14 जण जकमी झाले होते आणि सात दीर स्काऊट्स मारले गेले होते.