
देशभरात दहावी आणि बारावीचे निकाल लागून झाले आहेत.आता विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रियाही जवळपास पूर्ण होत आली आहे. पण बॉलिवूडमधील कलाकार असोत किंवा आपला आवडता खेळाडू ते किती शिकलेत आणि त्यांना किती मार्क्स होते हे जाणून घ्यायला नक्कीच प्रत्येक चाहत्याला आवडतं. असाच एक रिझल्ट सध्या व्हायरल होत आहे. जो आहे सर्वांचा लाडका क्रिकेटर विराट कोहली.
विराट त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो
विराट त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे,त्याच्या अध्यात्माच्या प्रवासामुळे नेहमीच चर्चेत असतो. तो आहे तसा चाहते त्याला पसंत करतात. पण आपला हा आवडता खेळाडू नक्की लहानपणी कसा होता किंवा तो अभ्यासात कसा होता. त्याचे शिक्षण किती हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
कोहलीने नुकताच कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. आता तो टीम इंडियासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसेल. कोहलीने अचानक कसोटीतून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. सौरव गांगुलीपासून रवी शास्त्रीपर्यंत सर्वांनाच विराटच्या निवृत्तीने आश्चर्य वाटले आहे.
विराट अभ्यासातही किती हुशार होता?
खेळाबद्दल बोलायचं म्हटलं तर, विराट कोहलीने खूप लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. तोपर्यंत, त्याने अंडर-19 विश्वचषकात भारताला विजय मिळवून देऊन एक वेगळीच छाप पाडली होती. त्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराटच्या व्हायरल झालेल्या मार्कशीटवरून तो फक्त क्रिकेटमध्येच नाही तर तो अभ्यासातही तेवढाच हुशार होता.
गणितातील गुण पाहून चाहते अवाक्
व्हायरल झालेल्या त्याच्या मार्कशीटवरून विराटला इंग्रजीमध्ये 83 गुण होते, हिंदीमध्ये 75 गुण, सामाजिक शास्त्रात 81 गुण, आयटीमध्ये 74 गुण आणि गणितात 51 गुण होते. विराटचे गणितातील गुण पाहून काही चाहत्यांनी गंमतीशीर कमेंट्सही केल्या आहेत. तर काहींनी त्याचं कौतुक करत म्हटलं आहे की, “कागदावर गुण हे फक्त संख्या असतात, खरे रत्न म्हणजे कठोर परिश्रम आणि समर्पण आहे,”. असं म्हणत चाहत्यांनी त्याची बाजू घेतली आहे.
Had marks been the sole factor, the entire nation wouldn’t be rallying behind him now.
Passion and Dedication are the key. @imVkohli pic.twitter.com/aAmFxaghGf— Jitin Yadav (@Jitin_IAS) August 9, 2023
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आयएएस अधिकारी जितिन यादव यांनी कोहलीची मूळ दहावीची गुणपत्रिका शेअर केली होती. गुणपत्रिका शेअर करताना जितिन यादव यांनी लिहिले होते की, “शैक्षणिक गुण हे यशाचे एकमेव माप नाही. खरोखर महत्त्वाची आहे ती आवड, समर्पण आणि कठोर परिश्रम.
कोहलीने क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला
विराट कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले ज्यामध्ये टीम इंडियाने 40 सामन्यांमध्ये विजय मिळवला. कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी सर्वाधिक 5864 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरवून कसोटी मालिका जिंकणारा विराट हा पहिला आशियाई कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 5 वर्षे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 9 द्विपक्षीय मालिका जिंकल्या.