Virat Kohli Video : मैदानातच नव्हे विराट मिमिक्रीतही अव्वल, टीम इंडियाच्या खेळाडूची हुबेहूब नक्कल; Video पाहून हसू आवरणार नाही…

विराट कोहली फलंदाजीत तर सुपरहिट आहे, तर तो ॲक्टिंगमध्येही अव्वल आहे. अनेकवेळा तो मिमिक्री करून त्याचे छुपे गुण दाखवत असतो. असाच त्याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये त्याने सहकारी खेळाडूची मिमिक्री केली आहे. ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Virat Kohli Video :  मैदानातच नव्हे विराट मिमिक्रीतही अव्वल, टीम इंडियाच्या खेळाडूची हुबेहूब नक्कल; Video पाहून हसू आवरणार नाही...
विराटचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jan 10, 2026 | 12:02 PM

टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे. 2026 मध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालितील पहिला सामना खेळणार असून, उद्या म्हणजेच रविवारी 11 जानेवारी रोजी वडोदरा येथेही मॅच रंगणार आहे. संपूर्ण भारतीय संघ मैदानावर सर्वोत्तम प्रयत्न करत जिंकण्यासाठी सज्ज आहेच पण यावेळीही लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांवर आहे. नुकतेच हे दोन्ही फलंदाज ट्रेनिंगमध्ये मोठी मेहनत करताना दिसलेच पण त्याबरोबरच त्यांची मजाही सुरूच होती. विशेषतः कोहली पूर्ण फॉर्ममध्ये दिसत होता आणि सर्वांसमोर स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचीही त्याने थोडी मजा घेतली.

वडोदरा येथे उद्या होणाऱ्या या सामन्यापूर्वी, टीम इंडियाने नवीन कोटाम्बी स्टेडियममध्ये 2-3 दिवसांपासून जोरदार सराव केला. याच प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देखील होते, त्यांनी नेटमध्ये जोरदार सराव केला, काही चांगले शॉटही मारले. पण त्याच्या फलंदाजीसोबतच, कोहलीने त्याच्या मिमिक्रीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सतत कोणत्या ना कोणत्या तरी टीममेटची किवा माजी खेळाडूची नक्कल करणाऱ्या कोहलीच्या निशाण्यावर या वेळा होता अर्शदीप सिंग.

कोहलीचा व्हिडीओ व्हायरल

खरंतर, टीम इंडियाच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू सराव करण्यापूर्वी वॉर्म अप करताना दिसत आहेत. त्याचवेळी अर्शदीप सिंह हा धावण्याच्या तयारीत होता, तेव्हा त्याला पाहून कोहलीला मजा घेण्याची लहर आली. मग काय.. त्याने थेट अर्शदीप धावतो त्याप्रमाणे धावण्याची नक्कल सुरू केली आणि त्याला चिडवू लागला.

 

अर्शदीपसह त्या सेशनला उपस्थित असलेले सर्व खेळाडू कोहलीकडे पाहतच राहिले. रोहित शर्मालाही हसू आवरता आले नाही. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यावर तर हिटच झाला. . कोहली आणि टीम इंडियाचे चाहते तर हा व्हिडीओ शेअर करत आहेच. पण अर्शदीप सिंगची आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज नेही हा फोटो पोस्ट करत मजा घेतली.

बडोदा मॅचसाठी मोठा उत्साह

उद्याच्या मॅचबद्दल बोलायचं झालंतर, वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे आणि चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. या उत्साहाचे एक कारण म्हणजे विराट आणि रोहितची हजेरी. हा या मैदानावरील त्यांचा पहिला आणि कदाचित शेवटचा सामना असू शकतो. पुढील एकदिवसीय सामन्यासाठी बडोदा स्टेडियमला आणखी वाट पहावी लागू शकते. आणि तोपर्यंत कोहली आणि रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असतील की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच कोहली आणि रोहितचा खेळ पाहण्याची चाहते ही दुर्मिळ संधी गमावण्यास तयार नाहीत. प्रत्येक जण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.