
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 9 महिन्यांच्या आतच दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली. गेल्या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकला होता आणि आता टीम इंडियाने दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा निवृत्त होईल अशी चर्चा सुरू होती, पण तसं काहीच झालं नाही. उलट कर्णधार रोहित शर्मा निवृत्त झाला नसून आपण खेळतच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. कोणीही निवृत्त होत नसल्याचे रोहितने पत्रकार परिषेदत सांगितलं. देशभरातच नव्हे तर परदेशातही रोहितच्या निवृत्तीबद्दल विविध चर्चा सातत्याने सुरू आहे. दरम्यान आता याच मुद्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित अजूनही निवृत्त का होत नाहीये हेच पाँटिगने स्पष्ट केलं.
म्हणून रोहितने घेतली नाही निवृत्ती ?
रोहित शर्माने निवृत्ती न घेण्यामागे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाचे कारण असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. ‘ माझ्या मते मागच्या वर्ल्ड कपमधील पराभव आणि रोहित कर्णधार असल्यामुळे त्याला अजून निवृत्ती घ्यायची इच्छा नाही. त्याला पुन्हा एकदा T20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना पाहिलं असेल तर त्याची वेळ संपली असे तुम्ही म्हणू शकत नाही.” असे पाँटिगने सांगितलं.
फायनलमध्ये रोहितची कमाल
9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रोहितने न्यूझीलंडविरुद्ध 76 धावांची शानदार खेळी केली आणि शुभमन गिलसोबत 105 धावांची सलामी भागीदारी केली. यामुळे भारताने 251 धावांचे लक्ष्य पार केले आणि टीमने 4 गडी राखून विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. यापूर्वी रोहितने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इतिहास रचला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने जिंकलेली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 विश्वचषक या चार ICC स्पर्धांच्या अंतिम फेरीत आपल्या संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार ठरला.
गेल्या वर्षी जूनमध्ये बार्बाडोसमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित आणि विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर, दोन्ही खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, रविवार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. ‘मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाहीये, कोणीही अफवा पसरू नये’ असे रोहितने स्पष्ट केलं होतं.
रोहितमध्ये अजूनही दम आहे – पाँटिंग
एप्रिलमध्ये 38 वर्षांचा होणाऱ्या रोहितने 2021 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. तो अजूनही टॉप लेव्हलवर परफॉर्म करण्यास सक्षम असल्याचे त्याच्या निर्णयांवरून स्पष्ट होतं. ‘जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीत या टप्प्यावर पोहोचत, तेव्हा सगळेजण तुमच्या निवृत्तीबद्दल वाट पाहतात, चर्चा करत असतात. पण फायनल मॅचमध्ये (रोहितचा) एवढा चांगला खेळ पाहिल्यावर तो अजूनही खेळण्यास सक्षम आहे, हेच दिसतं. वनडेचा नेक्स्ट वर्ल्डकप खेळणं हे आपलं लक्ष्य असल्याचं सांगून त्याने त्याची बाजू स्पष्ट केली आहे, असं मला वाटतं, असंही पाँटिंग म्हणालाय
2027साली पढचला वनडे वर्ल्डकप हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण त्याच्याकडे अजूनही संघाचे नेतृत्व करण्याची आणि मोठे सामने जिंकण्याची क्षमता आहे. 2027 मध्ये रोहित आणि त्याची टीम पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून भारताचे स्वप्न पूर्ण करेल अशी अनेकांना आशा आहे.