
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या सामन्यात तिलक शर्माने शानदार पुनरागमन केलं. या सामन्यात त्याने फक्त 29 चेंडूत 193 च्या स्ट्राईक रेटने 56 धावांची खेळी खेळली आणि संघाची बाजी पलटली. 222 धावांचा पाठलाग करताना, स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या बाजूने हा सामना झुकला. मात्र तो 18 व्या षटकात बाद झाला आणि मुंबईने 12 धावांनी हा सामना गमावला. पण तिलकने आपली ताकद दाखवून देत छाप सोडली. असं असली तरी गेल्या सामन्यात त्याच्या संथ खेळीमुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याला सामन्याच्या मध्यभागी रिटायर्ड आऊटही करण्यात आल्याने त्याला अपमानाचा सामना करावा लागला होता. मात्र आता मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने अखेर मौन सोडत याबाबतचं सत्य सांगितलं.
तिलक वर्माला रिटायर्ड आउट का केलं ?
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात संथ खेळीमुळे अखेर रिटायर्ड आऊट होण्याच्या अपमानाचा बदला तिलक वर्माने घेतला. वानखेडेवर त्याने आपल्या बॅटने सर्व टीकाकारांना उत्तर दिले. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने तिलक वर्मा रिटायर्ड आऊट झाल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर गेल्या सामन्यात तिलक वर्मा याच्या बोटाला दुखापत झाली होती, तरी तो खेळत होता असा खुलासा हार्दिकने बँगलोरविरुद्धच्या सामन्यानंतर केला.
हार्दिक म्हणाला, “तिलकने आज शानदार फलंदाजी केली. त्याने आज उत्तम कामगिरी केली. पण गेल्या सामन्यात बरेच काही घडले. लोक त्याच्याबद्दल बरंच काही बोलत होते. पण लोकांना हे माहित नाही की सामन्याच्या आदल्या दिवशी तो खूप जखमी झाला होता. तो ( रिटायर्ड आऊट) एक टेक्निकल निर्णय होता. त्याच्या बोटाला लागलं होतं, त्यामुळे (त्याच्या बदल्यात) दुसरा नवा खेळाडू येऊन त्याने मोठे शॉट्स मारले तर बरं होईल असा विचार कोचने केला ” असं हार्दिकने नमूद केलं.
तिलकची संथ खेळी
आयपीएल 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने खराब फलंदाजी केली. तो प्रत्येक धाव घेण्यासाठी अगदी आतूर झाला होता. चौकार आणि षटकार मारून सामना जिंकण्याचे त्याचे प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होते. 204 धावांचा पाठलाग करताना त्याला 23 चेंडूत फक्त 25 धावा करता आल्या. त्यामुळेच, अखेर 19 व्या ओव्हरमध्ये त्याला रिटायर्ड आउट करून बाहेर बोलावण्यात आलं. तिलक वर्मा याला रिटायर्ड आऊट करण्याचा आणि त्याला परत बोलावण्याचा निर्णय त्यांचा होता असा खुलासा मुंबई इंडियन्सच्या मुख्य कोचने लखनौविरुद्धच्या पराभवानंत केला होता.
त्यांच्या मते, हे एका रणनीतीचा भाग म्हणून केले गेले. सामन्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्याने तिलक वर्मा याला परत बोलावलं. ज्याप्रमाणे फुटबॉल सामन्यात व्यवस्थापक शेवटच्या क्षणी त्याच्या बदली खेळाडूला मैदानावर आणतो,त्याचप्रमाणे क्रिकेटमध्येही एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही अशी खंत कोचने व्यक्त केली.