IND vs NZ Semi Final : न्यूझीलंडला 239 धावात रोखलं, भारताला 240 धावांची गरज

| Updated on: Jul 10, 2019 | 3:23 PM

आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा स्थगित सामना आज पुन्हा त्याच स्थितीतून 46.1 षटकापासून सुरु झाला.

IND vs NZ Semi Final : न्यूझीलंडला 239 धावात रोखलं, भारताला 240 धावांची गरज
credit - bcci
Follow us on

IndvsNZ World Cup Semi Final लंडन : आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारताने न्यूझीलंडला 8 बाद 239 धावात रोखलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 240 धावांची गरज आहे.   पावसामुळे काल स्थगित झालेल्या सामन्याला आज पुन्हा सुरुवात झाली. न्यूझीलंडने आज 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवरुन सुरुवात केली. भुवनेश्वरने आपली कालची ओव्हर आज पूर्ण केली. त्यानंतर बुमराहने टाकलेल्या 48 व्या षटकात रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम थ्रोवर न्यूझीलंडचा रॉस टेलर बाद झाला. टेलरने 90 चेंडूत 74 धावा केल्या. मग पुढच्याच षटकात भुवनेश्वरने टॉम लॅथम आणि मॅट हेन्रीला माघारी धाडलं. 

न्यूझीलंडचा आज 23 चेंडूचा खेळ बाकी होता. यामध्ये भारताने तीन विकेट घेत 28 धावा दिल्या. रवींद्र जाडेजाची अप्रतिम फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा स्थगित सामना आज पुन्हा त्याच स्थितीतून 46.1 षटकापासून सुरु झाला. मँचेस्टरमध्ये आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र आज सूर्यदर्शन झाल्याने भारतीय प्रेक्षकांना दिलासा मिळाला. टॉम लॅथम आणि रॉस टेलर हे मैदानात उतरले. तर भुवनेश्वरने आपल्या 8.1 ओव्हरपासून सुरुवात केली.

कालचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे  स्थगित करण्यात आला. अर्धवट झालेल्या कालच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीपुढे किवींची चांगलीच दमछाक झाली. न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या आहेत. आज 46.1 षटकानंतर पुन्हा पुढील खेळाला सुरुवात होईल.

आजही पावसाचा अंदाज

दरम्यान काल स्थगित केलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना आज राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. मात्र आजही मँचेस्टरमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सेमीफायनच्या सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे चाहत्यांची मात्र निराशा होताना पाहायला मिळत आहे.

…तर भारतासमोर किती धावांचं टार्गेट?

आजही पावसाचे सावट कायम असल्याने भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे खेळवण्यात येईल. न्यूझीलंडने 46.1 षटकात 211 धावा केल्या आहेत. त्यानुसार भारताला 46 षटकात 237 धावांचे टार्गेट मिळेल. तर जर हा सामना 40 षटकांचा खेळवण्यात आला तर भारताला 223 धावांचे आव्हान मिळेल. जर 35 षटकांचा सामना झाल्यास 209, 30 षटके 192, 25 षटके 172 आणि 20 षटकांचा झाल्यास 148  धावांचे टार्गेट डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताला मिळू शकते.

आजही सामना रद्द झाल्यास पुढे काय?

जर आज मँचेस्टरच्या मैदानात होणारा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गुणतालिकेत भारत सध्या 15 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जर सामना रद्द होऊन भारताला 1 गुण मिळाला तर भारताच्या खात्यात 16 गुण जमा होतील. दुसरीकडे न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना एक गुण मिळाला तर त्यांच्या खात्यात  12 गुण जमा होतील. त्यामुळे सर्वाधिक गुणांमुळे भारत सहज फायनलमध्ये पोहोचेल.

टीम इंडियाने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यातील 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला असून एका सामन्यात भारताचा पराभव झाला. विशेष म्हणजे पावसामुळे रद्द झालेला सामना हा न्यूझीलंडविरोधातच खेळवण्यात येणार होता. यामुळे 15 गुणांसह भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने 9 सामन्यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर भारतविरुद्धचा साखळी सामना रद्द झाला होता. त्यामुळे 11 गुणांसह न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा सध्या रनरेट +0.809 आहे, तर न्यूझीलंड +0.175 आहे.

आयसीसीच्या नियमानुसार सेमी फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास ज्या संघाचे गुण आणि रनरेट जास्त असेल त्या संघाना थेट फायनलचे तिकीट दिले जाते. म्हणजेच भारत सेमीफायनचा सामना अर्धवट खेळून थेट फायनलमध्ये दाखल होईल. तर दुसरीकडे पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात येईल.