राम भक्तांनो, होऊ नका सावज, राहा सावध, रिकामे होईल बँक खाते

| Updated on: Jan 20, 2024 | 10:36 AM

VIP Entry Scam | अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात भगवान श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा मोठ्या भक्ती भावाने करण्यात येणार आहे. आता काही सायबर भामटे या सोहळ्याचा गैरफायदा घेत आहे. प्रभू रामाच्या नावाने गंडा घालण्यात येत आहे. ई-कॉर्मस साईटवर प्रसाद देण्याचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता व्हीआयपी प्रवेशाचा स्कॅम समोर येत आहे.

राम भक्तांनो, होऊ नका सावज, राहा सावध, रिकामे होईल बँक खाते
Follow us on

नवी दिल्ली | 20 January 2024 : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात भगवान श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाला जगभरातून अनेक मान्यवर, साधू संत, भाविक उपस्थित राहत आहेत. या सोहळ्याला हजर राहता यावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्याचाच फायदा काही सायबर भामटे उठवत आहे. प्रभू श्रीरामाच्या नावाने भाविक भक्तांना गंडा घालण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाईन मोफत प्रसादाचा घोटाळा उघड झाल्यानंतर आता 22 जानेवारी रोजीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी VIP Entry च्या नावाखाली गंडा घालण्यात येत आहे.

बँक खाते होईल रिकामे

अयोध्येतील डोळे दिपवणाऱ्या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित असतील. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक व्हीआयपी सहभागी होतील. त्यामुळे या व्हीआयपी एंट्री करुन देण्याच्या बहाण्याने काही सायबर भामटे भाविकांना गंडा घालत आहेत. त्याविषयीचे मॅसेज व्हॉट्सअप आणि इतर सोशल माध्यमांवर आले आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास काही सेकंदात तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

मॅसेजमध्ये दावा काय

सायबर भामटे, रामभक्तांना जाळ्यात ओढत आहेत. त्यासाठी शुभसंदेश पाठविण्यात येत आहेत. या मॅसेजमध्ये रामभक्तांना 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी VIP पास देण्याचे आमिष दाखविण्यात येते. त्यासोबत एक लिंक पण पाठविण्यात येते. यामध्ये एक एप डाऊनलोड करुन ते इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हीआयपी पास देण्याची थाप मारण्यात येते. तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्या तर समजून जा, तुमचे बँक खाते रिकामे होईल.

असा घालतात गंडा

सायबर भामटे VIP पास एंट्रीच्या नावाखाली हा गंडा घालत आहेत. लिंकवर क्लिक केल्यावर एप डाऊनलोड होते. त्यामाध्यमातून तुमच्या स्मार्टफोवर एनी डेस्क आणि टीमविवर असे एप इन्स्टॉल करण्यात येतात. त्याआधारे सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातील रक्कम दुसरीकडे वळवतात.

मंदिर प्रशासनाचे आवाहन

केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनाने सर्वसामान्य भाविकांना या घोटाळ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मंदिराने कोणतीही व्हीआयपी एंट्री नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच व्हीआयपी दर्शनासाठी कोणतेही एप तयार करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेऊ नका.